
नांदुरा खुर्दच्या बोपले कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; शेतमजूर कुटुंबप्रमुख बळीराम बोपले यांची आत्महत्या
MH 28 News Live / ( राहुल चोपडे ) नांदुरा : नांदुरा खुर्द येथे शेतमजूर बळीराम बोपले यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, बोपले यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बळीराम बोपले हे शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांचे कुटुंबीय दोन दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते कुटुंबीय परत आल्यानंतर बळीराम भोपले यांचा मृतदेह घरात फाशी घेतलेल्या अवस्थेत लटकलेला आढळून आला. त्यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने नांदुरा खुर्द परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच ओम साई फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आवश्यक ते सहकार्य केले. या घटनेची माहिती नांदुरा पोलिसांनाही देण्यात आली असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
दरम्यान, बळीराम बोपले यांनी आत्महत्या करण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या घटनेमागे कोणते कारण होते, याबाबत तर्कवितर्क करणे योग्य ठरणार नाही. पोलिस तपासातूनच या घटनेची पार्श्वभूमी स्पष्ट होऊ शकेल.
बोपले यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आघात सहन करावा लागत असून, या दुःखद घटनेने परिसरातील नागरिकही हळहळ व्यक्त करीत आहेत. या प्रकरणाची योग्य चौकशी करून घटनेमागील परिस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नांदुरा पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.



