♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

      नशेचा काळाबाजार झाला उघड… जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई; ११ लाख रुपये किमतीचा २२ किलो गांजा जप्त… शेगाव – खामगाव मार्गावर दोघे ताब्यात; नांदुरा पोलिसांकडूनही तरुणावर गुन्हा दाखल

 

MH 28 News Live / बुलढाणा : जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाई तीव्र केली असून, दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण २२ किलो ३२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या गांजाची किंमत सुमारे 11 लाख रुपये आहे. स्थानिक गुन्हे शाखेने शेगाव-खामगाव मार्गावरील सवर्णा शिवारात कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले, तर नांदुरा पोलिसांनी वडनेर भोलजी शिवारात गांजा जप्त करत एका २० वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सवर्णा शिवारात १० लाखांचा मुद्देमाल जप्त

बुलढाणा जिल्हा पोलिसांच्या ‘मिशन परिवर्तन’अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी शेगाव – खामगाव मार्गावरील यश ढाब्याजवळ छापा टाकला. गोपनीय माहितीच्या आधारे सवर्णा शिवारात सापळा रचून केलेल्या या कारवाईत २० किलो ५६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत १० लाख २६ हजार रुपये असल्याची माहिती आहे. याशिवाय दोन दुचाकी आणि दोन मोबाइलही पोलिसांनी जप्त केले. या कारवाईत एकूण १० लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी शेगाव येथील हुसेन खान युसूफ खान (वय २५) आणि आसिफ खान एजान खान (वय २९) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड आणि पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक यशोदा कणसे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

वडनेर भोलजीतही गांजा जप्त

दरम्यान, नांदुरा पोलिसांनी नांदुरा – मलकापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ लगत वडनेर भोलजी शिवारातील हॉटेल शान – ए – गुलिस्ता समोर कारवाई केली. शनिवारी दुपारी २.३५ ते सायंकाळी ४.१० वाजतादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. यावेळी एक किलो ४७२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. त्याची अंदाजित किंमत ७३ हजार ६०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी अब्दुल अरशद अब्दुल नासीर (वय २०, रा. कारंजा मोहत्त्या, वडनेर भोलजी) या तरुणाविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम अर्थात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील या दोन कारवायांमुळे अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांविरोधात पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवल्याचे स्पष्ट होत आहे. गांजाची विक्री, वाहतूक आणि साठवणुकीसारख्या बेकायदेशीर व्यवहारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास आणि कारवाई केली जात आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129