♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मलकापुरात डीजेचा दणदणाट! १२०.४ डेसिबल आवाजाने नियमांची ऐशीतैशी; १२ मालकांवर गुन्हे!

MH 28 News Live / मलकापूर : नवरात्रोत्सवाच्या उत्साहात ध्वनीप्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या डीजे चालकांवर मलकापूर शहर पोलिसांनी दणका दिला आहे. दुर्गादेवी स्थापना मिरवणुकांमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक आवाजात डीजे वाजविल्याप्रकरणी तब्बल १२ डीजे मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी ध्वनीमापक यंत्राद्वारे केलेल्या तपासणीत तब्बल १२०.४ डेसिबल आवाजाची नोंद झाल्याचे समोर आले. प्रशासनाने पूर्वसूचना देऊनही नियमांचे उल्लंघन सुरूच राहिल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.

मलकापूर शहरातील हनुमाननगर, नारखेडे कॉम्प्लेक्स, गाडगेबाबा टी पॉईंट, एसबीआय चौक, तहसील चौक, हनुमान चौक, हॉटेल विशाल परिसर, सूरज मेडिकलजवळ, टायटन दुकानासमोर आणि कन्हैया डेली नीड्स परिसरासह विविध ठिकाणी दुर्गादेवी स्थापना मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. या मिरवणुकांमध्ये कर्णकर्कश आवाजात डीजे वाजविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आवाजाची तपासणी केली. यावेळी ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित डीजे मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. मोठ्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना त्रास होण्याची शक्यता असून, उत्सवाच्या आनंदात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

या कारवाईत अक्षय बाजीराव तोत्रे (रा. पाझर घाटमळा, चांडवली बु., जि. पुणे), शुभम सुपडा लहाने (रा. साखळी बु., जि. बुलढाणा), रामराज्य मलकापूरवाला साऊंडशी संबंधित व्यक्ती, परेश विलास पाटील (जळगाव खुर्द, जि. जळगाव), गौरव अनिल पाटील (सनी पॅलेस, खामगाव), शुभम बाळू अंधारे (अदमपूर, जि. अकोला), चिरज प्रकाश गलवाडे (पंचशील नगर, भुसावळ) आणि आनंद जनार्दन वानखडे (खामगाव), अभिषेक रवींद्र चव्हाण (म्हसवेद, जि. सातारा) यांच्यासह एकूण १२ डीजे मालकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम २२३(ख), २७०, २९३ तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, कारवाईपूर्वीच पोलिसांनी डीजे चालक आणि मालकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ४ ऑक्टोबर रोजी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात बैठक घेऊन ध्वनीमर्यादेबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. बाहेरगावाहून आलेल्या डीजे मालकांना रविवारी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६८ अन्वये नोटिसा देऊनही नियमभंग सुरूच राहिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे ध्वनीमापक यंत्राद्वारे प्रत्यक्ष मोजमाप करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईमुळे उत्सवाच्या नावाखाली ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला असून, धार्मिक उत्सवांचा आनंद साजरा करताना ध्वनीमर्यादा पाळणे आणि नागरिकांच्या आरोग्याचा विचार करणे आवश्यक असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129