
‘ राजा बाबू ‘ गोविंदा मागणार खा. प्रतापराव जाधव यांच्यासाठी समर्थन; चिखली येथे सुप्रसिद्ध सिनेस्टार गोविंदा यांच्या रोड शोचे उद्या आयोजन
चिखली : महायुतीच्या वतीने बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक मैदानात उतरलेले खासदार प्रतापराव जाधव यांना मतदारांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ‘ राजा बाबू ‘ या भूमिकेमुळे प्रसिद्धी पावलेले सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते गोविंदा यांचा रोड शो 22 एप्रिल रोजी चिखली येथे आयोजित करण्यात आला आहे यादरम्यान गोविंदा यांच्या रोडशोची चिखलीकर यांना उत्सुकता लागली असून महायुतीच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात येत आहे.
आपल्या उत्स्फूर्त व सदाबहार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते गोविंदा हे अनेकांचे आवडते सिनेस्टार आहेत. जनमानसावर त्यांचा मोठा प्रभाव असून गोविंदा यांच्या चित्रपटाला देखील आजवर मोठी लोकप्रियता लाभली आहे. नुकताच गोविंदा यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. सध्या सुरू असलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ चिखली शहरात २२ एप्रिल रोजी गोविंदा यांचा रोड शो आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५ वाजता गोविंदा यांच्या रोड शोला जयस्तंभ चौकातून सुरुवात होईल. महायुतीचे उमेदवार खा. प्रतापराव जाधव, आ. श्वेताताई महाले यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील नेते देखील या रोड शो मध्ये गोविंदा यांच्या समवेत सहभागी होणार आहेत. त्या ठिकाणी त्यांचे स्वागत भाजप नेते दीपक काळे यांच्या वतीने करण्यात येत असून पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहचल्यानंतर भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सागर पुरोहित हे गोविंदा यांचे स्वागत करणार आहेत. बस स्थानक परिसरात आशीर्वाद मेडिकल येथे सिंधी समाजाच्या वतीने माजी नगरसेवक नामू गुरुदासानी हे गोविंदा यांचे स्वागत करणार असून पुढे हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह चौकात डॉ. प्रतापसिंह राजपूत व निळकंठ महाले यांच्या वतीने सिनेस्टार गोविंदा यांचे स्वागत होणार आहे. डीपी रोड परिसरात रोड शो पोचल्यानंतर तेथे सुधीर तांबट, सुशील शेटे, कीर्तीकुमार वायकोस व नंदू तिवारी यांच्या वतीने स्वागत होईल. पुढे तालुका जिनिंग प्रेसिंग संस्थेच्या समोर रोड शो पोहचल्यानंतर गोविंदा यांचे स्वागत शिवा इंगळे हे करतील. बाबूलाल चौकामध्ये जाहीर कुरेशी यांच्या वतीने स्वागत होईल तर वासुदेव बळवंत फडके चौकात चेतन देशमुख यांच्या वतीने गोविंदांचे स्वागत करण्यात येईल. तेथून गोविंदा हे वाहनावरून उतरून पायी चालत राजा टावर परिसरातून चिखली नगरीचे ग्रामदैवत श्री रेणुका मातेच्या मंदिरात जातील, तेथे देवीचे दर्शन घेऊन देवीला पातळ गोविंदा यांच्या हस्ते अर्पण करण्यात येईल. या ठिकाणी माजी नगराध्यक्ष सुहास शेटे यांच्या हस्ते गोविंदांचे स्वागत करण्यात येईल. रेणुका माता मंदिरातून निघाल्यानंतर मदिना मज्जिद येथे हा रोडशो पोहचणार असून पोस्ट ऑफिस समोर सलीम परवेझ, मुदसिर व अज्जू भाई यांच्या वतीने गोविंदा यांचे स्वागत करण्यात येणार आहे. या रोड शोसाठी चिखलीकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून मोठ्या संख्येने तरुण-तरुणी, महिलावर्ग, शहर व ग्रामीण भागातील नागरिक चिखली येथे गोविंदा यांना पाहण्यासाठी जमा हो होणार आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button