
औद्योगिक आस्थापनांसाठी रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम. औद्योगिक आस्थापनांनी लाभ घेण्याचे आवाहन
- MH 28 News Live, बुलडाणा : राज्यात जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात नांव नोंदविलेल्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकऱ्या मिळण्यासाठी सहाय्य व्हावे, म्हणून नियोजन मंडळाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजना सन १९६३ – ७४ पासून शासनाने कार्यान्वित केली आहे. सदर योजना जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलडाणा या कार्यालयामार्फत राबविण्यात येते. सदर योजनेत सहभागी होण्यासाठी ज्या व्यक्तीचे वय १८ वर्ष पूर्ण असून किमान शिक्षण शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची परीक्षा उत्तीर्ण व्यक्ती महाराष्ट्र राज्याची स्थानिक रहीवाशी असली पाहीजे. तसेच सेवायोजन नोंदणी असणे आवश्यक आहे.
या योजनेनुसार उमेदवारांना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण कार्यक्रम, खाजगी आस्थापनात व शासनाच्या अंगीकृत व्यवसायात कार्यान्वित करण्यात येतो. या कार्यक्रमातंर्गत उद्योजकांनी अधिसुचित केलेल्या प्रशिक्षणासाठी इच्छुक सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना सहा महिन्याचे प्रशिक्षणासाठी पाठवणी करण्यात येते. उमेदवारांना विविक्षित व्यवसायातील / क्षेत्रातील
कौशल्य प्राप्त व्हावे, किंवा त्यांचे कसब वाढावे, जेणेकरून प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ते नियमित नोकरीत योग्य पगारावर नेमण्यासाठी उद्योजकांना सहज स्विकार्य व्हावे. हा या कार्यक्रमाचा मागचा उद्देश आहे. तसेच सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी पगारी नोकरीच्या शोधात राहून निराश न होता, प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना हिमतीने स्वयंरोजगार सुरू करणे शक्य व्हावे, हा सुद्धा एक महत्वाचा उद्देश कार्यक्रमाचा आहे. प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये प्रशिक्षणार्थ्यांना पदाच्या शैक्षणिक अर्हतेनुसार दरमहा (सहा महिने) ३०० ते १००० हजार रूपया पर्यंत विद्यावेतन देण्यात येते. सदर योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असून योजनेची देयकेसुध्दा ऑनलाईन जनरेट होतात.
या योजनेचा लाभ घेण्याकरीता जिल्हयातील २५ च्या वर मनूष्यबळ कार्यरत असणाऱ्या आस्थापनांनी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नियोक्ता म्हणुन ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी केल्यानंतर नियोक्त्यांना युझर आयडी आणि पासवर्ड देण्यात येतो. सदर युझर आयडी आणि पासवर्ड चा वापर करून नियोक्ता त्यांचे लॉगीनमधून इ.पी.पी योजनेचा लाभ घेऊ शकतात.
जिल्हयातील अधिकाधीक औद्योगिक आस्थापनांनी सदर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती. प्रांजली बारस्कर यांनी केले आहे. आस्थापना नोंदणी आणि रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमबाबत काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलडाणा या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा अथवा सदर कार्यालयातील सचिन पवार, लिपीक टंकलेखक मो.क्र. 9552319696 वर संपर्क साधावा.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button