
अटलजी, मोदींपासून तर लालूप्रसाद ते जॉर्ज फर्नांडिसपर्यंत उदाहरणे देऊन दानवे यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिला यशाचा ‘ कानमंत्र ‘
MH 28 News Live, बुलडाणा : हे वर्ष निवडणुकांचे असून ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका अशा विविध निवडणुकांना जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांना सामोरे जायचे आहे. आजच्या बैठकीत जमलेल्या कार्यकर्त्यांपैकी बहुतांश उमेदवार असतील; त्यामुळे आपण सर्वांनी जनतेमध्ये जाऊन लोकांच्या सुख दुःखामध्ये सहभागी व्हावे आणि पक्षाचे कार्य अधिकाधिक जोमाने करून येत्या निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उतरावे असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी रावसाहेब दानवे यांनी आज केले. बुलढाणा येथे आयोजित आढावा बैठकीत प्रमुख भाषण करताना ते बोलत होते. या बैठकीत वेगवेगळ्या नेत्यांची उदाहरणे देऊन दानवे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना यशाचा कानमंत्र दिला.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील आढावा बैठकीचे आयोजन राजेंद्र गोडे यांच्या महाविद्यालयात बुधवार दिनांक 13 एप्रिल रोजी करण्यात आले होते. भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार अँड. आकाश फुंडकर, माजी आमदार चैनसुख संचेती, आ. श्वेताताई महाले यांच्यासह प्रदेश कार्यकारणी सदस्य माजी आमदार तोताराम कायंदे, माजी आमदार विजयराज शिंदे, डॉ. गणेश मांटे, प्रवक्ते विनोद वाघ, सोशल मीडिया प्रदेश सहसंयोजक सागर फुंडकर, जिल्हा सरचिटणीस मोहन शर्मा, संतोष देशमुख, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख आदी पदाधिकारी याप्रसंगी मंचावर उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी बुलडाणा जिल्ह्यातील तेराही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांकडून पक्ष कार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पक्षाची बांधणी आणि येणाऱ्या निवडणुकींना सामोरे जाण्यासाठी करावी लागणारी तयारी याबद्दल सखोल मार्गदर्शन आपल्या भाषणातून केले. आगामी लोकसभा निवडणुक अद्याप तरी दूर आहे. तत्पूर्वी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जायचे आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात यावे अशी सूचना ना. रावसाहेब दानवे यांनी जिल्हा पदाधिकाऱ्यांना यावेळी बोलताना केली.
वाजपेयी, मोदी, लालूप्रसाद आणि जॉर्ज फर्नांडिस..
राजकीय कार्यकर्त्यांनी समाजामध्ये कसे बोलावे, कसे राहावे, आपले आचार विचार आणि राहणीमान कसे असावे याबद्दलही दानवे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी वाजपेयी, विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव व जॉर्ज फर्नांडिस यांची वेगवेगळ्या संदर्भात उदाहरणे देऊन कार्यकर्त्यांनी नेहमी जनतेच्या सुख दुःखामध्ये सहभागी व्हावे व आपली राहणी नेहमी साधी सरळ व स्वच्छ असावी असे ते म्हणाले. यानुसार वागल्यास निश्चितच राजकीय यश मिळेल असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षाचा जनाधार अधिकाधिक व्यापक करण्यासाठी नवनवीन लोकांना पक्षाशी जोडावेच लागेल असे सांगून रावसाहेब दानवे यांनी बदलत्या राजकीय धोरणावर भाष्य केले. या आढावा बैठकीस जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.



