
कोचिंगशिवाय साध्य केले यश : पाडळीच्या वैभव भुतेकरांचा एमपीएससीत राज्यात द्वितीय क्रमांक
MH 28 News Live / बुलढाणा तालुक्यातील छोट्याशा पाडळी गावातील वैभव बबन भुतेकर या तरुणाने केवळ स्वबळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत राज्यातून द्वितीय क्रमांक मिळवत सहाय्यक आयुक्त (समाजकल्याण) पदावर निवड होऊन बुलढाणा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. स्पर्धा परीक्षा म्हणजे उमेदवाराची खऱ्या अर्थाने अग्नीपरीक्षा असते. अनेक वर्षे अभ्यास करून लाखो उमेदवार या परीक्षेत आपले नशीब आजमावतात, पण यश मोजक्याच जणांच्या पदरी येते. वैभव भुतेकर यांनी मात्र ग्रामीण भागात राहून, कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार न घेता, स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.

वैभव यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद हायस्कूल पाडळी येथे झाले. पुढे त्यांनी जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयातून बारावी, तसेच विदर्भ महाविद्यालय, बुलढाणा येथून कला शाखेची पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय, बुलढाणा येथून समाजकार्य विषयात पदव्युत्तर पदवी (एमएसडब्ल्यू) मिळवली. स्वतःचे वेळापत्रक आखून, नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करत वैभव यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने यश मिळवले. २०२१ मध्ये ते कर सहाय्यक, त्याच वर्षी मंत्रालय लिपिक आणि आदिवासी आश्रमशाळेवरील गृहपाल म्हणून निवडले गेले होते. २०२३ मध्ये ते जालना जिल्ह्यातील वालसा खालसा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत झाले.
२४ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या एमपीएससी निकालात वैभव भुतेकर यांनी राज्यात दुसरा क्रमांक मिळवत सहाय्यक आयुक्त (समाजकल्याण वर्ग-१) या प्रतिष्ठित पदावर आपली निवड निश्चित केली आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात अभिमानाची लाट उसळली आहे.

वैभव भुतेकर हे आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि गुरुजनांना देतात. त्यांनी दाखवून दिले आहे की, ग्रामीण भागातील विद्यार्थीही दृढ निश्चय, परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मोठी स्वप्ने पूर्ण करू शकतात.



