
खरीप हंगामासाठी जिल्ह्याला १. ७७ लाख मे. टन खताचे आवंटन मंजूर
MH 28 News Live, बुलडाणा : खरीप हंगामामध्ये जिल्ह्याचे 7.32 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. सोयाबीन, तूर, कापूस, ऊस, ज्वारी, मका, मुग, उडीद आदी पिके जिल्ह्यात घेण्यात येतात. जिल्ह्याला खरीप हंगाम 2022 करीता कृषि आयुक्तालयाकडून 1.77 लाख मेट्रीक टन रासायनिक खताचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे.
पुढील खरीप हंगाम दोन महिन्यावर आला असून खरीप पिकाची पेरणी झाल्यानंतर खताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. तसेच सध्या रशिया व युक्रेन या दोन देशांमधील युद्धामुळे खताची दरवाढ व रासायनिक खताची टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात आजरोजी खत विक्रेत्यांकडे युरीया 7468 मे. टन, डिएपी 1699 मे.टन,एमओपी 149 मे.टन, संयुक्त खते 7912 मे. टन, एसएसपी 19,470 मे.टन साठा उपलब्ध आहे. तरी शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी खरीप हंगाम 2022 साठी खते खरेदी करावी, असे आवाहन कृषि विकास अधिाकरी, जिल्हा परिषद, बुलडाणा यांनी केले आहे.