
सावधान…! जिल्ह्याचा क्राईम रेशो वाढत चाललाय. फक्त अडीच महिन्यात झाले ५ खून
MH 28 News Live, बुलडाणा : औद्योगिक विकास, कृषी विकास, आर्थिक विकास आणि विकासाच्या आघाड्यांवरील महाराष्ट्रातील मागासलेला जिल्हा म्हणून बुलडाणा जिल्ह्याची ओळख आहे. ही बाब जिल्हावासीयांना नेहमी बोचत असते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ‘ क्राईम रेशो ‘ मात्र वाढत चालला आहे. गेल्या अडीच महिन्यात जिल्ह्यात अनैतिक संबंध, या संबंधातून हत्या आणि आत्महत्यांचे प्रमाण मागील काही काळापासून लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून येत आहे. ही बाब निश्चितच जिल्हावासीयांची चिंता वाढवणारी आहे असेच म्हणावे लागेल.
बुलडाणा जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर लक्षात येईल की, मागील वर्षभरात ४२ खुनांच्या घटनांची नोंद झाली होती. यंदा हे प्रमाण वाढले आहे. केवळ अडीच महिन्यांत ५ जणांची हत्या होणे हा गंभीर विषय आहे. महत्त्वाचे म्हणजे, यापैकी जास्तीतजास्त खून अनैतिक संबंधांमुळे घडले आहेत. जिल्ह्यात सरत्या अडीच महिन्यांत झालेले ५ जणांचे खून व ७ जणांच्या खुनाचा प्रयत्न हा नक्कीच हलक्यात घेण्यासारखा विषय नाही.
सहसा जबर मारहाण, खून, आत्महत्या असे प्रकार अत्याधिक रागाच्या भरात घडतात. मात्र
काही घटनांमध्ये निव्वळ किरकोळ कारणावरून परस्परांना जीवनातून उठवण्याचा प्रयत्न झाल्याचे वास्तव समोर आले आहे. खासकरून स्त्री आणि पुरुषांमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणे, अनैतिक संबंध, तरुणांमधली वाढती व्यसनाधीनता व एकतर्फी प्रेम, संपत्तीमधील हिस्सेदारीवरुन भावांमधील वाद, दारु, चारित्र्यवरील संशय आणि अन्य कारणांवरून पत्नी – पत्नीच्या दरम्यान होणारी भांडणे, जुने वैमनस्य, शारीरिक वासनेचा उद्रेक अश्या वेगवेगळ्या कारणाने जिल्ह्याचा क्राईम रेशो वाढत चालला असून यावर नियंत्रण मिळवणे हे पोलीस विभाग आणि समाजासमोर उभे ठाकलेले मोठे आव्हान आहे.



