
मेहकर भागात बिबट्यांचा सुळसुळाट; एका शेतकऱ्यावर केला हल्ला
MH 28 News Live, मेहकर :. मेहकर वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या घाटबोरी बीट क्रमांक १ मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना काल, ३१ मार्चला घडली. महादेव शिंदे (४३, रा. दुर्गबोरी, ता. मेहकर) असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
महादेव शिंदे काल त्यांच्या शेतात गेले होते. झुडूपात लपलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. हल्ल्यात शिंदे यांच्या हात, पाठीला गंभीर दुखापत झाली. सोबतच्या मित्राने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे शेतकरी वेळीच धावत आल्याने बिबट्याने पळ काढला. शिंदे यांना उपचारासाठी तातडीने जानेफळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच मेहकर वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. तोंडीलायता यांनी वनपाल, वनरक्षकांना सोबत घेत रुग्णालयात जाऊन जखमी शेतकऱ्याची भेट घेतली. उन्हाळा सुरू झाल्याने वन्यप्राण्यांसाठी वनविभागाने कृत्रिम पाणवठे तयार करणे अपेक्षित असते. मात्र वनविभागाने पुरेसे पाणवठे तयार केलेले नसल्यानेच वन्यप्राणी पाण्याच्या शोधात शेतशिवारात व मानवी वस्त्यांत येत आहेत. त्यामुळे वनविभागाने प्राण्यांसाठी पाणवठ्यांची सोय करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.



