
कश्यामुळे वाढत आहे दिवसेंदिवस तापमान ? काय आहेत कारणे ?
MH 28 News Live : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उष्णतेचे खापर फक्त निसर्गावर फोडून चालणार नाही. नुकताच आयपीसीसीचा अहवाल प्रसिद्ध झालाय. याच पार्श्वभूमीवर कारणांचा आढावा घेणारा हा लेख.
आपण जर जागतिक तापमान नोंदीचा विचार केला तर ग्लोबल वार्ंमगचा परिणाम प्रकर्षाने जाणवतो. २०११ नंतरच्या तापमानवाढीने जगाला चक्रावून टाकले आहे. कारण आम्ही १९७५ नंतरची जी १० सर्वाधिक उष्ण वर्षे नोंदवली आहेत, त्यातील नऊ वर्षे ही फक्त २०११ ते २०२१ या दहा वर्षांतील आहेत. यावरून गेल्या दशकात ग्लोबल वॉर्मिंगचा किती भयानक परिणाम झालाय, याचा अंदाज येतो. हा धोका दरवर्षी वाढतच चाललाय हा चिंतेचा विषय आहे. अलीकडे आर्क्टिक आणि अंटार्क्टिका या दोन्ही ध्रुवांवर सर्वाधिक वॉर्मिंग होत आहे. तिथे उष्णतेच्या लाटा यायला सुरुवात झालीय. हा संपूर्ण जगासाठी गंभीर संकटाचा इशारा आहे.
मुंबई आणि महाराष्ट्रातही वॉर्मिंग ट्रेंड आहे. सगळीकडे कमाल तापमान वाढतच चालले आहे. यामागे ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरण बदलाचा संबंध आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात सातत्याने उष्णतेच्या लाटा धडकत आहेत. या लाटांची तीव्रताही जास्त असून त्यांचा प्रभाव दीर्घकाळ राहत आहे. हल्ली या लाटांचा मुक्काम सर्वसाधारण पाच दिवसांचा झाला आहे, तर विदर्भात सात ते नऊ दिवसही उष्णतेची लाट राहतेय. या बदलामागे स्थानिक कारणही आहे, ते म्हणजे अँटिसायक्लॉन सिस्टीम (प्रतिचक्रीवादळ). ही सिस्टीमवरून खालच्या भागात हवा पाठवते. तसेच जमिनीलगतच्या हवेची वर जाण्याची वाट रोखून धरते. या सिस्टीममध्ये उत्तर-पश्चिम हिंदुस्थानातून, विशेषतः राजस्थानच्या वाळवंटातून येणारी हवा कोरडी आणि उष्ण असते. या उष्ण हवेमुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात तापमानवाढ दिसून येते. याचदरम्यान सूर्यदेखील ही हवा आणखी उष्ण करून सोडतो. आकाश निरभ्र असते म्हणजेच ढगाळ वातावरण नसते. त्यावेळी सूर्याची किरणे थेट जमिनीवर धडकतात. परिणामी, उष्म्याचा कहर प्रचंड घामाघूम करून सोडतो.
इंटरगव्हर्नमेंट पॅनल ऑन क्लायमेट चेंजचा (आयपीसीसी) अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यातील निष्कर्ष आपणाला चिंता करायला लावणारे आहेत. आयपीसीसीने सन २०२१ पासून २०४० पर्यंत सरासरी तापमानाची पातळी १.५ अंशांनी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ही पातळी अवघ्या १ अंशाने वाढली तरी ती मानवी जीवनासाठी आणि इकोसिस्टमलाही धोका असेल.
वेट-बल्ब तापमान ३१ अंशांच्या पुढे जाण्याचा अनुमान आहे. याचा किती धोका आहे? निश्चितच हा एक मोठा धोका आहे. वेट-बल्ब तापमान हे थर्मामीटरमध्ये ओला कापड घालून मोजले जाते. या तापमानाची पातळी ३१ अंशांच्या पुढे जाणे मानवी शरीरासाठी त्रासदायक आहे. वेट-बल्ब तापमान सामान्य पातळीवर असते, तेव्हा आपल्या शरीरातून बाहेर येणारा घाम सुकतो. मात्र हे तापमान वाढले की घाम सुकणार नाही. आपल्या आसपासच्या हवेत ठरावीक मर्यादेपर्यंत पाणी शोषून घेण्याची क्षमता आहे. हवेतील आर्द्रता जर १०० टक्के झाली, तर हवा घामाचे पाणी शोषून घेऊ शकणार नाही. वेट-बल्ब तापमानामध्ये हवेतील बाष्पाचे प्रमाण मोजले जाते. वेट-बल्ब तापमानाची ३१ अंशांपर्यंतची पातळी मनुष्य सहन करू शकतो. मात्र हीच पातळी जर पुढे जाऊन 35 अंशांवर गेली तर निरोगी माणूसही केवळ सहा तास कसाबसा त्या तापमानात राहू शकतो. तापमानाच्या कमाल-किमान पातळीसोबतही वेट-बल्ब तापमानाची पातळीही गांभीर्याने विचारात घ्यायला हवी.
शहरीकरणामुळे किती परिणाम झालाय ?
आपल्याकडे सर्वच रस्त्यांचे काँक्रिटीकरण झालेय. मोकळी जागा कमी उरल्यामुळे उष्ण हवा काँक्रिटीकरणात फसली जातेय. पूर्वी उष्णता मातीवाटे निघून जायची. तसेच हरित क्षेत्र कमी होत चाललेय. झाडे तोडली जाताहेत. त्याचाही परिणाम होऊन उष्णता वाढू लागली आहे. मुख्य कारण म्हणजे हरितगृह वायू आहे. कार्बन डायऑक्साईड आणि हरितगृह वायूचे उत्सर्जन ग्लोबल वॉर्मिंगच्या प्रश्नाची तीव्रता भयानक वेगाने वाढवतेय. संभाव्य घातक जागतिक तापमानवाढ वेळीच रोखणे आवश्यक आहे. यासाठी आपल्याला हरितगृह वायू आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे बरेच प्रयत्न करावे लागतील. गाडय़ांच्या माध्यमातून होणारे प्रदूषण नियंत्रणात आणावे लागेल. याचा तापमानवाढीवर थेट संबंध आहे. सावध होण्याची हीच वेळ आहे.



