
त्या विधानानंतर यशोमती ठाकूर यांना शिवसेनेकडून केलं जातय लक्ष्य; तिखट शाब्दिक हल्ले झाले सुरू
MH 28 News Live : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर आज चित्र वेगळं असतं, असं विधान राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केल्यानंतर ते शिवसेनेच्या चांगलेच जिव्हारी लागले. त्यामुळे आता शिवसेनेकडून यशोमती ठाकूर यांना लक्ष्य करून त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू झाला आहे. त्यामुळे मविआ सरकारमधील सहभागी पक्षांमधील धुसफूस समोर येऊ लागली आहे.
शिवसेना नेत्या आणि विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सर्वप्रथम यशोमती ठाकूर यांना प्रत्युत्तर दिलं होतं. पण त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलेला शाब्दिक हल्ला जास्त तिखट आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या…
“आपल्याला पहिल्यांदा मंत्रीपद मिळालं आहे, त्यामुळे नीट काम करा”, असा सल्लाच पेडणेकरांनी यशोमती ठाकूर यांना दिला आहे. किशोरी पेडणेकर नेमकं काय म्हणाल्या ? “यशोमती ठाकूर या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. त्यामुळे त्यांनी अशाप्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं आहे. शरद पवार स्वत: महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महर्षी म्हणून काम करत आहेत. यशोमती ठाकुरांनी असे वादाचे मुद्दे तयार करु नयेत. तुमचं असंच म्हणणं जर असेल तर या मंत्रीमंडळात तुम्ही मंत्री राहील्या नसत्या. त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा मंत्रीपद मिळालंय तर नीट काम करा”, अशी रोखठोक प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.
नेमका विषय काय आहे ?
अमरावतीत डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला यशोमती ठाकूर यांच्यासह शरद पवार, राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार, खासदार नवनीत राणा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात भाषण करताना यशोमती ठाकूर यांनी शरद पवार आज मुख्यमंत्री असते तर राज्यातील सध्याचं चित्र वेगळं असतं, अशा प्रकारचं विधान केलं. यशोमती ठाकूर यांच्या अशाप्रकारच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीत धुसफूस असल्याच्या बातम्या प्रत्येक आठवडा, पंधरा दिवस किंवा महिन्याभरात समोर येतात. या अशा धुसफुसींच्या बातम्यांमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्यांमध्ये विविध चर्चांना उधाण येतं.
राज्यातील सत्ताधारी पक्षांमध्ये वारंवार मतभेदाच्या बातम्या समोर येत आहेत. महाविकास आघाडीत कधी काँग्रेस नाराज असते, तर कधी निधी मिळत नसल्याने शिवसेनेचे प्रतिनिधी नाराज असतात, विशेष म्हणजे पारनेरच्या सात नगरसेवकांच्या मुद्द्यावरुन स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज होते, असं चित्र बघायला मिळालं होतं. (KL राहुल पहिल्याच बॉलवर क्लिन बोल्ड होताच गर्लफ्रेंड आथियाची अशी होती रिअॅक्शन) दुसरीकडे शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी अनपेक्षितपणे केलेलं हिंसक आंदोलन, त्यानंतर यशोमती ठाकुरांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भर कार्यक्रमात केलेलं विधान या सगळ्या घडामोडी पाहता महाराष्ट्रातील राजकारण नेमकं कोणत्या दिशेला जातंय, याचा अंदाज बांधणं हे आजच्या घडीला कठीण असल्याचं चित्र आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या कार्यकाळात आणखी काय-काय घडेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



