
लग्नाच्या मध्यस्थीतून झाला वाद, विनोद इंगळे झाला जीवनातून बाद… चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे येथे खून
MH 28 News Live, चिखली : नवरा-बायकोमधील सततच्या भांडणाला कंटाळून पत्नी मामाकडे निघून गेली. तिच्यापाठोपाठ पती सुद्धा पत्नीच्या मामाकडे मामाच्या गावी आला आणि आपल्या मुलीच्या लग्नात मध्यस्ती केल्याच्या विषयावरून गावातीलच एका इसमाशी वाद घालू लागला. या वादाचे पर्यावसान एवढे भयंकर झाले की डोंगरशेवली येथील विनोद पंढरी इंगळे याला आपला जीव गमवावा लागला. विनोदची हत्या केल्याच्या आरोपाखाली चिखली पोलिसांनी बुद्धभूषण साहेबराव डोंगरदिवे यास अटक केली आहे. दि. 13 एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेमुळे चिखली तालुक्यात खळबळ माजली आहे.

या घटनेबद्दल सविस्तर माहिती अशी की चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथील विनोद पंढरी इंगळे ( ५० ) यांचे काही वर्षांपूर्वी ज्योती ( ३५ ) हिच्याशी लग्न झाले होते. परंतु विनोदच्या सततच्या दारू पिण्यामुळे आणि सततच्या भांडणाला कंटाळून ज्योतीने आपल्या मामाचे घर गाठले. ती आपल्या मामाकडे सावरगाव डुकरे येथे काही दिवसांपूर्वी राहायला आली. पत्नी सोडून गेल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेला विनोद देखील काही दिवसानंतर सावरगाव डुकरे येथे आला. काल दि. १३ एप्रिलला गावातीलच बुध्दभूषण डोंगरदिवे याच्याशी विनोदचे कडाक्याचे भांडण जुंपले. आपल्या मुलीच्या लग्नात मध्यस्ती व सोयरीक का केली म्हणून विनोद बुध्दभूषण याच्याशी भांडू लागला आणि या वादाचे पर्यावसान अखेर मोठ्या दुर्घटनेमध्ये घडले. बुद्धभूषण याने विनोद इंगळे सावरगाव डुकरे गावालगतच्या मालगणी शिवारात विनोदचा दगडाने ठेचून खून केला अशी फिर्याद मयत विनोदची पत्नी सविता इंगळे हीने चिखली पोलिसांकडे दाखल केली. ही घटना 13 एप्रिल रोजी सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान घडली. या घटनेमुळे चिखली तालुक्यात खळबळ उडाली आहे. चिखली पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू केला आणि आरोपी बुद्धभूषण डोंगरदिवे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन कलम ३०२ भा. दं. वि. अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.



