
खाद्यतेलाचा पुनर्वापर थांबवा – ना. डॉ. राजेंद्र शिंगणे
MH 28 News Live : अन्न सुरक्षेच्या नियमांनुसार खाद्यतेलाचा वापर तळण्यासाठी शक्यतो एकदाच करावा. खाद्यतेलाचा पुनर्वापर करताना तयार होणारे ‘ट्रान्सफॅट’ टाळण्यासाठी त्याचा जास्तीत जास्त तीनच वेळेस वापर करावा.

नियमाचे उल्लंघन केल्यास अन्न सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करा असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या सभागृहात शुक्रवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सह आयुक्त (औषधे) विराज पवनीकर, सहायक आयुक्त (औषधे) नितीन भांडारकर, सहायक आयुक्त (अन्न) प्रशांत देशमुख, अन्न सुरक्षा अधिकारी आनंद चौधरी, निरज लोहकरे, मनीष चौधरी उपस्थित होते.
डॉ. शिंगणे म्हणाले, खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. खाद्यपदार्थ नमुन्यांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात यावेत. ग्राहकांना सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने अन्नपदार्थ विक्रेते, हॉटेल्स आदी आस्थापनांची तपासणी करून अन्न नमुने घ्यावेत. तसेच नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी विशेष सप्ताह आयोजित करावेत. त्यांना अन्न पदार्थांची हाताळणी, स्वच्छता याविषयी माहिती द्यावी.
दरम्यान, खाद्यपदार्थातील भेसळ, प्रतिबंधित पदार्थांची विक्री रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेची माहिती देशमुख यांनी दिली. तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती पवनीकर यांनी दिली. ग्राहकांना सुरक्षित, निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने अन्नपदार्थ विक्रेते, हॉटेल्स आदी आस्थापनांची तपासणी नियमित करून अन्नाचे नमुने घ्यावेत. अन्नपदार्थ तळण्याकरिता वापरल्या जाणाऱ्या तेलाविषयी नियमांचे पालन करण्यासाठी व्यावसायिकांना बाध्य करावे असेही ते म्हणाले.
नागपुरात सुनावणी होणार
औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यांतर्गत कारवाई झालेल्या औषधी दुकानदारांची अपील प्रकरणे निकाली काढण्यासाठी लवकरच नागपुरात सुनावणी घेण्यात येईल. त्यादृष्टीने अन्न व औषध प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी.



