भयंकर… घरगुती भांडणामुळे उध्वस्त झाला चिखलीतील एक परिवार अल्पवयीन मुलावर झाले अंत्यसंस्कार तर आई आणि मुलीची मृत्यूशी झुंज. विषप्रयोग की आत्महत्या ? गूढ अद्याप कायम
MH 28 News Live, चिखली : घरगुती कारणावरून उद्भवलेल्या पती-पत्नीच्या भांडणाचा शेवट एक कुटुंब उध्वस्त होण्यामध्ये झाला. चिखली येथील तायडे कुटुंबामध्ये पती आणि पत्नीमध्ये झालेल्या भांडणाचे पर्यावसान भयानक झाले असून यामध्ये या परिवाराने आपला अल्पवयीन मुलगा गमावला, तर मयत मुलाची आई व बहीण औरंगाबाद येथील खाजगी इस्पितळात मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेबद्दल चिखली शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घडलेल्या या भयानक प्रकाराबद्दल थोडक्यात माहिती अशी की विष्णु भगवान तायडे ( ५३ ) हे चिखली नगरपालिकेमध्ये कर संग्राहक म्हणून सेवारत आहेत. विष्णू तायडे यांनी दुसरा विवाह केला असून त्यांची पहीली पत्नी व मुलगा हे त्यांच्यापासून वेगळे राहतात. सध्या ते आपल्या दुसऱ्या पत्नी धुरपदाबाई ( ३६ ) यांच्यासह चिंच परिसरातील आपल्या मालकीच्या घरामध्ये राहत असून त्यांना एक मुलगी निकीता ( १६ ) व मुलगा धनंजय ( १४ ) असा हा चौकोनी चौकोनी परिवार आहे. परंतु या परिवाराला नियतीची नजर लागली आणि होत्याचे नव्हते झाले.
प्राप्त माहितीनुसार विष्णू तायडे आणि त्यांच्या पत्नी मध्ये किरकोळ कारणावरून बरेचदा हा वाद होत असत. या वादाचे रूपांतर कधीकधी मोठ्या भांडणांमध्ये देखील होत असे. असाच वाद दोन दिवसांपूर्वी म्हणजे दि. 20 मे रोजी झाला. पती-पत्नीचा या वादाचे रूपांतर भांडणामध्ये झाले आणि या भांडणाने अखेर भयंकर स्वरूप घेऊन एक परिवार उध्वस्त झाला. विष्णू तायडे आणि त्यांच्या पत्नी मध्ये झालेल्या भांडणानंतर विष्णू तायडे हे जेवण करून रात्री बाहेर निघून गेले. ते घरी काही वेळानंतर ते घरी परतले तेव्हा पत्नी मुलगा धनंजय व मुलगी दोघेही तिघेजण झोपलेले त्यांना आढळून आले. त्यामुळे ते देखील झोपी गेले. रात्री दीड वाजेच्या सुमारास विष्णु तायडे यांना झोपेतून जाग आली. त्यांनी घरात पाहिले असता त्यांना आपली पत्नी व मुले कुठेच आढळून आले नाही त्यामुळे ते घराच्या बाहेर आले व त्यांनी चौकशी केली असता त्यांना घडलेला प्रकार कळला. विष्णु तायडे यांनी आपल्या मित्रांना फोन करून त्यांच्या सोबत डॉ. खेडेकर यांचे इस्पितळात गेले. तेथे त्यांना आपली पत्नी व दोन्ही मुले अत्यवस्थ असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे आढळून आले. दि. 21 मे च्या दिवसभर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र या उपचारादरम्यान रात्री दहाच्या सुमारास धनंजयची प्राणज्योत मालवली. दरम्यान पत्नी आणि मुलगी यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
विषप्राषण की विषप्रयोग ? गुढ कायम
या घटनेबद्दल परिसरातील रहिवाशांकडून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पोलिसांनी दाखल केलेल्या मर्गमध्ये देखील याबद्दल स्पष्टता नाही. त्यामुळे शंकाकुशंका निर्माण होत आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार पत्नीशी झालेल्या भांडणानंतर विष्णू तायडे बाहेर निघून गेले. ते घरी परतले तेव्हा घरात निजानीज झाल्याचे चित्र होते. मात्र मध्यरात्री पत्नीने उठून मुलगा धनंजय आणि मुलगी निकीता यांना घरातील उंदीर मारण्याचे रँटकील हे विषारी औषध पाजले आणि स्वतःदेखील हे औषध प्राशन केले. या विषाने थोड्या वेळातच आपला प्रभाव दाखवण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुलगा धनंजय आणि मुलगी यांना अस्वस्थ वाटू लागले पत्नी धूरपदाबाई यांना देखील अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांनी शेजारपाजारच्या लोकांना आवाज देऊन उठवले. मात्र कटाक्षाने विष्णू तायडे यांना उठवण्यात आले नाही. त्यानंतर आजूबाजूची मंडळी व गल्लीतल्या लोकांनी या तिघांनाही डॉ. खेडेकर यांच्या दवाखान्यात उपचारासाठी भरती केले. अर्थात या घटनेमागील तथ्य पोलीस तपासाअंतीच स्पष्ट होईल.
आदर्श विद्यालयात इयत्ता नववी मध्ये शिकणाऱ्या धनंजय हा या प्रकरणांमध्ये बळी गेला असून त्याच्यावर जुने गाव हिंदू स्मशानभूमी येथे आज दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान विष्णू तायडे यांचा पोलिसांनी जबाब नोंदवला असून त्यांची पत्नी व मुलगी औरंगाबाद येथे दवाखान्यात उपचार घेत आहेत. या संदर्भात चिखली पोलिसांनी मर्ग दाखल केला असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक बारापात्रे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. पती-पत्नीमध्ये वारंवार होणाऱ्या विसंवादाचा उद्रेक होऊन त्याचा एवढा भयानक अंत चिखली शहरात प्रथमच झाला. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button