
शेतकऱ्यांचे शेत जमीन मोजणीचे प्रलंबीत प्रकरणे निकाली काढा… स्वाभिमानी शेवटी संघटनेची मागणी
MH 28 News Live, चिखली : तालूक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेत मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे अर्ज करून पैसे भरले आहेत. परंतु, एक वर्ष उलटुनही या कार्यालयातून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पावित्रा घेतला. स्वाभिमानीचे विनायक सरनाईक व भगवानराव मोरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या घेवून उप अधीक्षक यांच्या चिखली येथील कार्यालयात दि. १ जून रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी चिखली भूमी अभिलेख कार्यालयाकडे शेतरस्ते मोकळे करण्यासाठी हिस्से वाटे झालेली जमीन सातबारा नुसार क्षेत्रफळ निश्चित करणेसाठी अर्ज केले आहेत. यामधे काहींनी साधी मोजणी, तातडीची मोजणी व अती तातडीच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे अर्ज करुन नियमाप्रमाणे पैश्याचा भरणा देखील केला आहे. परंतु पैसे भरलेल्यांचा शेत मोजणीचा विहित कालावधी उलटुन देखील प्रकरणे निकाली निघाली नसल्याने अनेकांना दुबार पैसे भरावे लागले. अनेकांची मोजणी झाली परंतु आजपर्यत हद्दकायम (खुना) निश्चीत केलेल्या नसल्याचे व शेतात गेल्या नंतर मोजणी मशीन नादुरुस्त होणे व विविध कारणे दाखवून अनेक प्रकरणे प्रलंबीत असल्याने व पैसे घेवून काम होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत तर दुसरीकडे मात्र कर्मचारी कमी असल्याचे सांगून वेळकाढू धोरण अवलंबले जात आहे. पावसाळा तोंडावर आला असल्याने मोजणी होणार तरी कधी ? असा सवाल शेतकरी उपस्थीत करीत असुन याबाबत जाब विचारण्यासाठी गेल्यानंतरही उडवाउडवीचे उत्तरे मिळत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेत उप अधिक्षक यांच्या दालनात ठिय्या आंदोलनास सुरुवात केली होती. एक प्रकारे या कार्यालयाचा ताबाच शेतकर्यानी घेतला होता. दरम्यान तालुक्यातील प्रलंबीत प्रकरणे निकाली काढण्यात यावी, विहीत वेळेत मोजणी न करणे ही कार्यालयाची चूक असून दुबार पैसे भरणा केलेल्या शेतकऱ्यांची रक्कम परत करण्यात यावी, साधी मोजणी, तातडीची मोजणी व अती तातडीच्या मोजणीसाठी पैसे भरणा करुनही प्रकरणे प्रलंबीत का राहली या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यात यावी, रीक्त असलेली पद भरण्यात यावी व भूमी अभिलेख कार्यालयातील प्रभारी पदावर कायमस्वरूपी उप अधिक्षकाची नेमणूक करण्यात यावी यासह आदी मागण्या करण्यात आल्या असुन या आंदोलनामुळे अनेकांची मोजणीची तारीख निश्चित करण्यात आली तर अनेकांच्या समस्या देखील आंदोलनामुळे मार्गी लागल्या आहेत. मागण्यांची पुर्तता करण्याचे अश्वासन वरीष्ठांकडुन देण्यात आल्याने चार तासानंतर आंदोलन स्थगीत करण्यात आले. शेतकऱ्यांच्या समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी भगवानराव मोरे, विनायक सरनाईक, नितीन राजपूत, भारत वाघमारे, अनिल वाकोडे, रविराज टाले, शुभम पाटील, बाळकृष्ण पाटील, अमोल तिडके, रवी मेहत्रे, सुनील मोरे, सरदारसिंग इंगळे, औचितराव वाघमारे, मधुकर सोळंकी, अनिल शिराळे, गोपाल परसणे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
धुळखात पडलेल्या रिकाम्या खुर्चीचेच केले स्वागत…
अनेक दिवस उप अधीक्षक या पदाचा प्रभार देण्यात आला आहे. परंतु प्रभारी अधिकारी सुद्धा आँफीसमधे येत नसल्याचे कार्यालयातील व टेबलवर चढलेल्या धुळीवरुन उघड झाल्याने व कार्यालयातील साफ सफाई होत नसल्याचे समोर आले. अधिकारीच नसेल तर कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहणार कसे व प्रलंबीत कामे होणार कशी ? असा सवाल उपस्थीत करत रिकाम्या खुर्चीचे स्वागत करण्यात आले.



