
बैलजोडी चौक सौंदर्यीकरण व जुने गावातील रस्त्याच्या कामांची केली आ. श्वेताताई महाले यांनी पाहाणी; कंत्राटदार व प्रशासनाला दिल्या सूचना, नागरिकांशी साधला संवाद
MH 28 News Live, चिखली : शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प केलेल्या आ. श्वेताताई महाले यांनी कधी नव्हे तो कोट्यावधी रुपयांचा निधी चिखली नगरपालिकेसाठी खेचून आणला आहे. या विकास निधीच्या माध्यमातून शहरांमध्ये अनेक लहानमोठी भरीव विकास कार्ये होत असून सौंदर्यकरणाच्या माध्यमातून शहराला नवी ओळख देण्याचा प्रयत्न आ. महाले करत आहेत. सध्या शहरात सुरू असलेली विविध कामे उत्कृष्ट दर्जाची व्हावी यासाठी आ. श्वेताताई महाले स्वतः या कामांमध्ये जातीने लक्ष घालत आहेत. दि. ७ जून रोजी त्यांनी चिंच परिसरातील रस्त्याच्या बांधकामाची व बैलजोडी चौकाच्या सौंदर्यकरणाची पाहणी करून नगरपालिका प्रशासन व कंत्राटदारास आवश्यक त्या सूचना केल्या.
शहरातील जुने गाव आणि नवीन गावाला जोडणाऱ्या चिंच परिसरातील पूल व रस्त्याचे बांधकाम आणि बैलजोडी चौकाचे सौंदर्यकरणाचे काम मागील महिन्यापासून सुरू झाले आहे. यामध्ये बैलजोडी चौकापासून ते काझीरंगा मस्जिद पर्यंतच्या १ कोटी रुपये किंमतीच्या रस्त्यासह साई मेडिकल पासून स्वातंत्र्यवीर सावरकर चौकापर्यंतचा ५७ लाखांचा रस्ता आणि १ कोटी २० लाख रुपये किमतीचे बैलजोडी चौकाचे सौंदर्यकरण या तीन कामांचा समावेश आहे. जुने गाव परिसरासाठी दोन कोटी ७७ लक्ष रुपयांची विकास कामे आ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नातून सध्या सुरू आहेत. या कामांची प्रत्यक्ष पाहणी आ. महाले यांनी ७ जून रोजी केली तसेच या कामाच्या उत्कृष्ट दर्जा राखण्याबद्दल कंत्राटदाराला सूचना केल्या आणि नगरपालिका प्रशासनाला देखील आवश्यक ते निर्देश दिले. येथे उपस्थित असलेल्या नागरिकांशी देखील आ. श्वेताताई महाले यांनी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या तसेच त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. नागरिकांनी देखील सुरू असलेल्या कामांच्या दर्जाबद्दल समाधान व्यक्त करत आ. श्वेताताई महाले यांनी जुने गाव परिसरातील नागरिकांकडून बऱ्याच वर्षांपासून होत असलेली ही मागणी पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद दिले.
चिखलीकरांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्धल – आ. श्वेताताई महाले
जिल्ह्यातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र व मोठी व्यापार पेठ म्हणून नावारूपास आलेल्या चिखली शहराचा सौंदर्यकरण व विकास कार्याच्या माध्यमातून कायापालट करण्याचा आपला मानस असल्याचे प्रतिपादन यावेळी आ. श्वेताताई महाले यांनी केले. याचाच एक भाग म्हणून जुने गाव परिसरातील नागरिकांची बऱ्याच वर्षांपासून होत असलेली बैलजोडी चौक सौंदर्यकरण आणि चिंच परिसरातील सीमेंट रस्त्यांची मागणी देखील या माध्यमातून पूर्ण करण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या. या रस्त्यांमुळे जुने गाव परिसरातील गणेश नगर, बारभाई मोहल्ला, सैलानी नगर, सदानंद नगर, नवनाथ नगर, संभाजीनगर, श्रीकृष्ण नगर तसेच जाफराबाद रस्त्यावरील नागरिकांना मोठी सुविधा होणार असल्याने हजारो नागरिकांना या सुविधेचा लाभ मिळेल अशी अपेक्षा आ. श्वेताताई महाले यांनी व्यक्त केली.
यापूर्वी दोनदा झाले होते याच रस्त्याचे बांधकाम
सध्या बांधकाम सुरू असलेल्या चिंच परिसर ते काळजी मस्जिद पर्यंतच्या रस्त्याचे यापूर्वी पाच वर्षांमध्ये दोन वेळेला डांबरीकरण करण्यात आले होते. ६० ते ७० लक्ष रुपये यासाठी खर्च करण्यात आले होते. परंतु, या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला व काम देखील निकृष्ट दर्जाचे अनेक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व जागरूक नागरिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. शिवाय हा रस्ता दोन वेळेला उघडला त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सुध्दा मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता.
यावेळी शेख अनीस, गोविंद देव्हडे, सुभाषअप्पा झगडे, शिवराज पाटील, सागर पुरोहित, महेश लोणकर, संदिप लोखंडे, हरीहर सोळंके, सर्जेराव भूते, चेतन देशमुख, राहुल गुळवे, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.