
यंदा भरला दोन वर्षांपासून खंडित असलेला भोगर्या बाजार. आदिवासींच्या होळीला सुरुवात
MH 28 News Live, जळगाव जामोद : परस्परांच्या मनातील द्वेष भेदभाव आणि असूयेला मुठमाती देऊन आनंद साजरा करण्याचा उत्सव म्हणजे होळी. होळी हा सण शहरी भागापेक्षा ग्रामीण भागांमध्ये आणि त्याहूनही अधिक आदिवासी भागांमध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. जिल्ह्यातील जळगाव जामोद आणि संग्रामपूर या आदिवासीबहुल तालुक्यांमधील आदिवासी बंधू-भगिनी या सणाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. होळी सण शहरांमध्ये केवळ एका दिवसापुरता साजरा होतो; परंतु आदिवासी भागात मात्र हा सण आठ ते दहा दिवस चालतो. यामध्ये भोगर्या बाजार हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकार असून तो केवळ आदिवासी भागांमध्ये पाहायला मिळतो. होळीच्या निमित्ताने भरणारा हा भोगर्या बाजार सुरू झाला असून आदिवासी बांधव होळी साजरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
होळी सणाची खरेदी ही भोगऱ्या बाजारामधून केली जाते. गेल्या तीन वर्षापासून कोरोनामुळे हा बाजार भरत नव्हता. यावर्षी कोरोनाचे निबंध प्रशासनाने शिथिल केल्यामुळे यावल तालुक्यातील वागझिरा या गावांमध्ये शेजारील दहा पंधरा गावातील आदिवासी समाज बांधव एकत्र येत मोठ्या उत्साहाने भोगऱ्या बाजारामध्ये. खरेदी करत आहेत.
आदिवासी समाजाचा सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे होळी हा सण असतो. या होळी सणाला जो नैवेद्य दाखवला जातो त्यासाठी लागणार्या साहित्याची खरेदी या बाजारातून केली जाते. वागझिरा गावालगत असणाऱ्या १० / १५ खेड्यातील आदिवासी समाज बांधवही याच बाजारातून होळीसाठी लागणाच्या साहित्याची आणि नैवेद्याला लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी एकत्र जमत असतात.