लम्पीचा कहर – बुलढण्यात गुरं दगावण्याचं प्रमाण सर्वाधिक, धक्कादायक आकडेवारी समोर
MH 28 News Live, बुलढाणा : जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत गुरांना लम्पी आजाराची प्रचंड लागण झाली आहे. हा आजार आटोक्यात आणण्यात प्रशासनाला आतापर्यंत यश मिळालं नसल्याचं दिसून आलं आहे. लम्पी आजारामुळे राज्यात सर्वात जास्त गुरे दगावण्याचं प्रमाण बुलढाणा जिल्ह्यात आहे. आतापर्यंत 4500 च्या वर गुरं लम्पी आजारानं दगावली आहेत. तसेच मागील 4 महिन्यांपासून आतापर्यंत 49 हजार 891 गुरांना लम्पी आजारानं ग्रासलं आहे. शेतकऱ्यांचं महत्वाचं धन म्हणजे, गाय-बैल. त्यांच्यावर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. यावर्षी अगोदरच निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. आता लम्पी आजारानं शेतकऱ्यांजवळ असलेलं पशुधन दगावत असल्यानं बळीराजा प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूरचे शेतकरी हे आहेत सुधीर मानकर. यांच्याकडे जवळपास 8 गायी आन 4 बैल होतेत. मात्र लम्पीनं यांच्या चार गायी दगावल्या असून अजूनही दोन गायींना लम्पीनं ग्रासले आहेत. विशेष म्हणजे, यांनी काही आठवड्यांपूर्वी सर्व जनावरांचे लम्पी लसीकरण सुद्धा केलं होतं. अद्याप यांना शासनाकडून कुठलीही मदत मिळाली नाही.
बुलढाण्यात राहणारे शेतकरी विजय वानखडे. यांच्याकडे जवळपास 12 ते 15 गोवर्गीय गुरं होती, पण यांच्याही गुरांना लम्पीनं ग्रासलं आणि चार जनावरं मृत्युमुखी पडली. अनेकदा पशुधन विकास अधिकाऱ्यांकडे यांनी गुरे दगवल्याची माहिती दिली पण साधी नोंदही यांची घेतल्या गेली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
बुलढाणा जिल्ह्यात लंपी आजारावर मात करण्यासाठी पशु संवर्धन विभाग सज्ज असून आतापर्यंत लसीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचा भास करत आहे. मात्र लम्पी आजारावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आतापर्यंत यश मिळालं नसल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यात बुलढाणा जिल्ह्यात सर्वात जास्त गुरं दगावली असल्यानं जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यातील पशूपालन धारकांनी आपल्या गुरांचं लसीकरण करुन घ्यावं, असं आवाहन पशु संवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीण कुमार घुले यांनी केलं आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button