मोताळ्याजवळ टँकर आणि दुचाकीमध्ये धडक, दुचाकीस्वारांचा मृत्यू, एक जखमी
MH 28 News Live, मोताळा : टँकर व दुचाकी अपघातात दुचाकीवरील एक जण ठार तर, एक गंभीर जखमी झाल्याची घटना मोताळा शहरातील श्री भारत पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी (ता. २३) रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. अपघातातील जखमीला ताबडतोब बुलडाणा येथील सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले.
या अपघाताबाबत थोडक्यात माहिती अशी की, पिंपळखुटा येथील गजानन लक्ष्मण अढाव आणि अनिल सोनोने हे दोघे जण दुचाकी (एम.एच. ०३ ए.क्यू. ३३१६) ने बुलढाण्याकडून मलकापूरकडे जात होते. तर, टँकर (आर.जे. १४ जी. जी. ९७३६) हा मलकापूर – बुलडाणा रस्त्यावरील मोताळा येथील श्री भारत पेट्रोल पंपावरून डिझेल भरून बाहेर निघत होता.
यावेळी सदर दुचाकी व टँकरचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील गजानन लक्ष्मण अढाव यांचा जागीच मृत्यू झाला. तर, अनिल सोनोने हा गंभीर जखमी झाला. नागरिकांनी जखमीला तातडीने उपचारासाठी बुलडाणा येथील रुग्णालयात हलविले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दुचाकीवर गवंडी कामगारांना मिळणारी पेटी होती. त्यामुळे दोघे जण गवंडी कामावरील मजूर असल्याची शक्यता आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button