
भिंगारा घाटात ट्रक दरीत कोसळला; दोन ठार, दोघे जखमी
MH 28 News Live / जळगाव जामोद : ११ ऑगस्ट – जळगाव जामोद-बऱ्हाणपूर मार्गावरील सातपुडा पर्वतरांगांतील भिंगारा घाटात काल रात्री एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने जाणारा आयशर ट्रक नियंत्रण सुटल्याने अर्धा किलोमीटर खोल दरीत कोसळला.

या अपघातात अमरावती येथील प्रभू दिलीप मोड आणि गुमगावचे सावन मनोहर दहिकर हे दोघे जागीच ठार झाले. तर आणखी दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक बऱ्हाणपूरहून जळगावच्या दिशेने जात होता. रात्रीच्या अंधारात आणि घाटातील वळणांवर भरधाव वेगाने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट खोल दरीत कोसळले. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.



