
हिंदू जनआक्रोश महामोर्चा – २ जानेवारी रोजी बुलढाण्यात सभा. मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
MH 28 News Live, चिखली : वाढते धर्मांतरण, गोहत्याबंदी कायदा लागू व्हावा, लव जिहाद विरोधी कायदा अस्तित्वात यावा, हिंदू महापुरुष व देवी देवतांची विटंबना बंद व्हावी आदी मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने दि. २ जानेवारी २०२३ रोजी बुलढाणा येथे हिंदू जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत आयोजित सभेत जिल्ह्यातील हिंदू बांधव व माता भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हिंदूत्वनिष्ठ विचारसरणीच्या सर्व लहानमोठ्या संघटना हिंदू हिताच्या मुद्यावर एकत्र येण्याची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोर्चे निघत आहेत. बुलढाणा जिल्ह्यात देखील हिंदू जनआक्रोश महामोर्चा दि. २ जानेवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. बुलढाणा येथील जयस्तंभ चौकातील टिळक नाट्य क्रीडा मंदिराच्या प्रांगणात सकाळी ११ वाजता सभेला सुरुवात होईल. हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजयभाई देसाई आणि हिंदुत्वाची तोफ कालीचरण महाराज यांचे या सभेला प्रमुख मार्गदर्शन लाभणार असून ह. भ. प. बाबुराव महाराज वाघ, पंढरपूर, अटल पांडे, वर्धा, संतोषसिंह गहेरवाल, नांदगांव पेठ, अमरावती, शिवव्याख्यानकार भाग्यश्रीताई मोहिते व ज्योत्सनाताई नागरे यांची देखील भाषणे होणार आहेत. या सभेसाठी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील हिंदू बांधव व माता भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.