
दोन सरसंघचालकांना प्रशिक्षण देणारे ज्येष्ठ संघ स्वयंसेवक नागोराव गवळी गुरुजी यांचे निधन
MH 28 News Live, अमडापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बुलढाणा जिल्ह्यातील पहिले प्रचारक तसेच विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत व दिवंगत सरसंघचालक के. सुदर्शन यांना दंडयुध्दाचे प्रशिक्षण देणारे ज्येष्ठ संघ स्वयंसेवक नागोराव गवळी गुरुजी ( ९३ ) यांचे दि. ३ जानेवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य रुजवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे नागोराव गवळी गुरुजी हे मुळचे यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी होते. १९४८ मध्ये संघावर आलेल्या पहिल्या बंदीमध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिखली नगर प्रचारक म्हणून त्यांची नियुक्ती केली. पुढे त्यांनी जिल्हा प्रचारक म्हणून देखील जबाबदारी सांभाळली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागोराव गवळी यांनी विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत व दिवंगत सरसंघचालक के. सुदर्शन यांना संघ शिक्षा वर्गात दंडयुध्दाचे प्रशिक्षण दिले होते. स्व. गवळी यांना द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचा निकटचा सहवास लाभला होता. जिल्ह्यात संघ विचाराच्या शिक्षण संस्थांचे जाळे निर्माण करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. चिखली अर्बन बँकेच्या उभारणीतही गवळी यांनी तत्कालीन जिल्हा संघचालक भगवानदास गुप्त यांना मोलाचे सहकार्य केले होते. संघाचे विदर्भ प्रांत शारीरिक प्रमुख तसेच भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत प्रमुख अशा विविध जबाबदार्या त्यांनी पार पाडल्या. आणीबाणीच्या काळात १९ महिने कारावास भोगलेले गवळी गुरुजी हे जेष्ठ लोकतंत्र सेनानी सुद्धा होते. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे. संघ परिवारातील विविध संघटनाकडून स्व. नागोराव गवळी गुरुजी यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.