
महाराणा प्रताप हायस्कूलचा आगळा उपक्रम
MH 28 News Live, लोणार : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने स्थानिक महाराणा प्रताप हायस्कूल मध्ये एका आगळ्या- वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचे शारीरिक शिक्षक राजेश हिंगे यांच्या कल्पनेतून ग्रामिण व दुर्गम भागातील व जीवनात कधीही प्रत्यक्ष रेल्वे प्रवास न केलेल्या अथवा न अनुभवलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थीनींना प्रत्यक्ष रेल्वे प्रवास घडवून आनंद व अनुभव मिळवून देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
शाळेतील इयत्ता दहावीच्या रेल्वे प्रवास न केलेल्या इयत्ता दहावीच्या ग्रामिण भागातील मुलींची निवड करून ‘बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येत असलेल्या ३ जानेवारी रोजी शेगाव ते नांदुरा पर्यंत रेल्वे प्रवास घडवुन आणला. या दरम्यान मुलींना प्रत्यक्ष रेल्वे स्टेशन, रेल्वेची ये – जा, प्लॅटफॉर्मचा परिचय ई. गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. अशा अनुभवातून मुलींचा आत्मविश्वास वाढून खऱ्या अर्थाने मुली प्रत्यक्ष जीवनातील संकटांना कणखरपणे सामोरे जाव्यास सक्षम बनतात शालेय जीवनातील अशा अनुभवांची खऱ्या अर्थाने गरज आहे. याच उद्देशाने श्री. हिंगे सरांनी स्वखर्चाने या बालिकांना हा अनुभव मिळवून दिला. यावेळी नांदुरा रेल्वे स्टेशन मास्टर उईके व नगराध्यक्षा रजनीताई जवरे यांनी मुलींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.



