
काळवीट प्रकरणात चाकू हल्ला; एक गंभीर जखमी, तपास सुरू
MH 28 News Live / चिखली :अमोना – देऊळगाव घुबे रोडवर १० ऑगस्ट रोजी दुपारी घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यालगत एका अज्ञात व्यक्तीने काळवीट बांधून ठेवले होते. हा प्रकार पाहण्यासाठी व त्याची माहिती घेण्यासाठी काही नागरिक घटनास्थळी पोहोचले. मात्र, याच दरम्यान संशयिताने अचानक दोन जणांवर चाकूने हल्ला केला.

या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून, त्याला तात्काळ चिखली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसऱ्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे. हल्ल्यानंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी संशयिताच्या तीन गाड्या व बांधून ठेवलेले काळवीट सापडले असून, यामुळे या प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे.
काळवीट बांधून ठेवण्यामागील कारणे, हल्ल्याचे नेमके कारण आणि संशयिताचा उद्देश याबाबत पोलीस कसून तपास करत आहेत. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार काळवीटाचे बाळगणे, बांधून ठेवणे वा शिकार करणे गंभीर गुन्हा असल्याने वन विभागालाही या प्रकरणात सहभागी करून चौकशी सुरू आहे. सध्या जखमी व्यक्तीवर उपचार सुरू असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. ही घटना वन्यजीव संरक्षण, कायदा सुव्यवस्था आणि ग्रामीण भागातील सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर मानली जात असून, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.



