
लोणार सरोवराला वाढत्या पाण्याचा धोका, परिसरातील मंदिर पाण्याखाली, पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष
MH 28 News Live : लोणार विवर हे जसे जागतिक आश्चर्य आहे, तसेच या विवराच्या तळाशी निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर हेही एक आश्चर्य आहे. या पाण्याचा पीएच हा १०.५ इतका जास्त असल्याने शेवाळवर्गीय वनस्पती वगळता यात कोणताही सजीव प्राणी जगण्याची शक्यता नव्हती. मात्र, लोणार विवराचे सातत्याने वाढत जाणारे पाणी पाहता हे वैशिष्ट्यच आता लोप पावते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
लोणार विवराच्या बाजूला असणारे जीवंत झरे, गायमुख धार, ब्रम्हकुंड, पापहरेश्वर, सीतान्हानी आणि रामगयामुळे प्राचीन काळी पंचाप्सर अशी याची ओळख होती. ही ओळखच आता नामशेषाच्या मार्गावर आहे. विवराच्या काठावर असणाऱ्या अकराव्या-बाराव्या शतकातील मंदिरांपैकी बगिचा महादेव मंदिर, अंबरखाना महादेव मंदिर, मोर महादेव मंदिर पूर्णपणे पाण्यात गेले आहे. कधी नाही ते कमळजा माता मंदिरही एका बाजूने पाण्याने वेढले आहे. या मंदिरांनाही धोका निर्माण झाल्याने भाविकांमध्ये चिंता वाढली आहे. पाचही नैसर्गिक प्रवाह पूर्ण क्षमतेने लोणार विवराला येऊन मिळत आहेत व त्यामुळे सरोवराची पाण्याची पातळी वाढत असल्यचे स्पष्टपणे दिसत आहे.
लोणारला पुरातत्त्व विभागाचे उपमंडळ कार्यालय आहे, पण संबंधित अधिकारी मुख्यालयी राहात नाहीत. जागतिक आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या लोणार विवर परिसरात महत्त्वाची स्मारके आहेत. मात्र, त्याची डागडुजी गेल्या दहा वर्षात करण्यात आली नाही. मागील तीन वर्षांपासून लोणार परिसरात अतिवृष्टी होत आहे. लोणारचे सरासरी पर्जन्यमान ७५० मीलीमीटर इतके आहे, पण सध्या तेथे एक हजार मिलीमीटरपेक्षाही जास्त पाऊस पडत आहे. लिंबी बारव विभागाने खोलून ठेवले. पावसाळ्यात पावसाचे पाणी त्यात घुसले, पण अजूनपर्यंत कामाला सुरुवात झालेली नाही. विवराच्या पाणलोट क्षेत्रात विविध सरकारी विभाग खोदकाम करत असतात. त्यामुळे देखील लोणार विवराला धोका निर्माण झाला आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button