
चिखली ‘ तालुक्यातील मातोश्री पाणंद शेत रस्त्याची कामे तात्काळ सुरू करा अन्यथा आंदोलनाचा राम डहाके यांचा इशारा
MH 28 News Live, उदयनगर : चिखली तालुक्यात मातोश्री पाणंद शेत रस्ता योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी शासनाने गेल्या काळात मोठ्या प्रमाणात शेत रस्त्याची कामे मंजूर करत गाजा वाजा केला. मात्र पावसाळा अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपला असताना सुद्धा कुठेच कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली नसल्याने शेतकरी हित लक्षात घेता काँग्रेस नेते राम डहाके यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांची भेट घेऊन चिखली तालुक्यातील शेत रस्त्याची मंजूर कामे तात्काळ सुरू करून वेळेत पावसाळ्याआधी पूर्ण करण्यासंदर्भात दिनांक १८ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून असल्याने शेतरस्ते हेच ग्रामसमृद्धीचे द्योतक आहे.गेल्या तीन ते चार वर्षापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सदृश पाऊस पडतो त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी शेतात जाणे जिकरीचे होते काही शेतकऱ्यांना तर खराब रस्ते व चिखलामुळे पेरणी सुद्धा करता येत नाही तर काहींना ऐन हंगामात शेतमाल घरी आणण्यापासून मुकावे लागते त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.पावसाळ्यात शेतात पेरणीयंत्र,फवारणी यंत्र यासह हंगामात मळणीयंत्र बैलगाडी,ट्रॅक्टर नेता येत नाही.परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होऊन नुकसान होते. शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळून शेतकऱ्यांना शेतकामात सुलभता यावी यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला मात्र प्रत्यक्षात कुठेच काम होताना आढळून येत नाही त्यातच पावसाळा चार महिन्यावरून ठेपला त्यामुळे शेतस्त्याची कामे प्रत्यक्षात केंव्हा सुरू करणार व ती केंव्हा पुर्ण होणार? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. ही बाब लक्षात घेऊन येणाऱ्या पावसाळ्यात शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून काँग्रेस नेते राम डहाके यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे भेट घेऊन योजनेअंतर्गत मंजूर असलेले शेतरस्ते व त्यांची कामे तात्काळ सुरू करून वेळेत पावसाळ्या आधी पूर्ण करण्यासंदर्भात निवेदनाद्वारे मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला.



