
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या साह्यानेच मानवी जीवन सुकर आणि समृद्ध होऊ शकते – विद्याधर महाले
MH 28 News Live, चिखली : दिवाळीच्या सुट्टीनंतर विद्यार्थ्यांना वेध लागलात ते आगळ्यावेगळ्या उत्साहाचे म्हणजे विज्ञान जत्रेचे! ही विज्ञान जत्रा अर्थात विज्ञान मेळाव्याचे. यावर्षी चिखली अर्बन विद्यानिकेतन येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याचे उदघाटन विद्याधर महाले (खाजगी सचिव उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सहसचिव दर्जा) यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सतीश गुप्त (अध्यक्ष चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक व विद्यानिकेतन सीबीएससी स्कूल) हे होते.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ एम सी आयचे सदस्य डॉ. आशुतोष गुप्त, एस डी भारसाकळे (गटविकास अधिकारी वर्ग १) पंचायत समिती चिखली, उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर ,जि. प. बुलढाणा, डी डी वायाळ , गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बुलढाणा, एम एल धंदर, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मोताळा व चिखली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी समाधान खेडेकर हे उपस्थित होते. तालुक्यातील ग्रामीण भागातून बालवैज्ञानिक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाल वैज्ञानिकांमधून उद्याचे भावी वैज्ञानिक निर्माण व्हावे याकरिता महाराष्ट्र शासन दरवर्षी विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवत असते. चिखली पंचायत समितीमधून खूप मोठ्या संख्येने या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे उद्घाटक विद्याधर महाले यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मानवी जीवनातील उपयोग व विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यासाठी विज्ञान या विषयाची मदत कशाप्रकारे होते हे सांगितले. अध्यक्षीय भाषणामध्ये सतीश गुप्त यांनी आपल्या विद्यालयातील रोबोटिकचे दालन विद्यार्थ्यांसाठी खुले करण्याचे जाहीर केले. विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचा आधार घेऊन आपली प्रगती करावी असेही ते या वेळी म्हणाले. या विज्ञान प्रदर्शनीमध्ये उच्च माध्यमिक व माध्यमिक या गटामधून जवळपास १४१ उपकरणे बालशास्त्रज्ञांनी प्रदर्शनासाठी मांडली होती. एवढ्या भरगच्च प्रमाणातील प्रतिसाद पाहून सगळेच भारावून गेले. विज्ञान प्रदर्शनी च्या निमित्ताने विविध विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दि. १४ जानेवारीला प्रश्नमंजुषा, स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धा अशा प्रकारे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले आहे. याप्रसंगी चिखली पंचायत समितीतील सर्व केंद्रप्रमुख, विज्ञान संघटनेतील सदस्य, त्याचबरोबर विज्ञान शिकवणारे सर्वच शिक्षक मंडळी तसेच बालवैज्ञानिक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलडाणाचे प्रवीण वायाळ, तालुका विज्ञान शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मुकिम पटेल यांचा यामध्ये महत्त्वाचा वाटा होता. आपल्या प्रास्ताविकातून चिखली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनी समस्त बालवैज्ञानिकांचे कौतुक केले व भविष्यात वैज्ञानिक निर्माण होतील असा आशावाद व्यक्त केला. याप्रसंगी बोलताना डॉ. आशुतोष गुप्त यांनी त्यांच्यातर्फे विज्ञान प्रदर्शनीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके जाहीर केली. चिखली अर्बन विद्यानिकेतनचे प्रा. गौरव शेटे व विद्यालयाचे सर्व शिक्षक यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजय मोंढे यांनी तर आभार प्रदर्शन आर आर पाटील यांनी केले.