उगवत्या सूर्याच्या देशात श्वेताताईंनी केले प्रज्ञासूर्याला अभिवादन… जपान दौऱ्यात आ. श्वेताताई महाले यांची वाकायामा विद्यापीठातील बाबासाहेबांच्या स्मरकास भेट
MH 28 News Live, चिखली : जपानची ओळख जगात ‘ उगवत्या सूर्याचा देश ‘ अशी आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जपानला प्राचीन संस्कृती, कला आणि आध्यात्मिक परंपरा देखील लाभलेली आहे. अशा आधुनिकता आणि प्राचीन वारशाचा संगम असलेल्या जपानच्या अभ्यास दौऱ्यावर महाराष्ट्र शासनाच्या प्रतिनिधी मंडळात आ. श्वेताताई महाले सु़ध्दा सहभागी झाल्या आहेत. या अंतर्गत तेथील कोयासन विद्यापीठाला त्यांनी दि. १८ एप्रिल रोजी भेट दिली आणि तिथे उभारलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आदरांजली अर्पण केली.
महाराष्ट्र विधीमंडळातील आमदार दि. ११ एप्रिल पासून जपानच्या अभ्यास दौऱ्यावर मुंबई रवाना झाले आहेत. या दौऱ्यावर जपानमधील शहरांना तसेच गावांना भेटी देऊन विविध संस्था, विद्यापीठे आणि वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती महाराष्ट्रातील आमदार घेत आहेत. याच श्रुंखलेत आज दि. १८ एप्रिल रोजी आ. श्वेताताई महाले यांनी वाकायामा प्रांतातील कोयासन विद्यापीठात भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळयाला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी वाकायामा प्रांताचे गव्हर्नर, तेथील स्पीकर, कोयासन विद्यापीठाचे कुलगुरू तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
*ना. फडणवीस यांनी केले होते पुतळ्याचे अनावरण*
वाकायामा प्रांतातील कोयासन विद्यापीठात उभारण्यात आलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या या पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १० सप्टेंबर २०१५ रोजी बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून करण्यात आले होते आणि वाकायामा येथे परदेशातील प्रभावी व्यक्तीमत्वाचे उभारलेले हे पहिलेच स्मारक आहे हे विशेष.
*जपानी लोकांमध्ये बाबासाहेबांविषयीची आस्था पाहून भारावले – आ. श्वेताताई महाले*
हजारो वर्षांपासून असलेल्या धार्मिक, सांस्कृतिक आणि व्यापारी संबंधांच्या घट्ट धाग्यांनी जुळलेले भारत आणि जपानमधील ऋणानुबंध आजच्या युगातही तेवढेच दृढ असून भविष्यात देखील ते असेच राहतील असा विश्वास यावेळी बोलताना आ. श्वेताताई महाले यांनी व्यक्त केला. अस्पृश्यता निर्मुलनाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य केवळ महाराष्ट्र किंवा भारतापुरते मर्यादित नसून जगातील संपूर्ण मानव समाजासाठी ते प्रेरणादायी असल्यानेच बाबासाहेब हे विश्वरत्न ठरतात आणि प्रतिकुल परिस्थितीशी संघर्ष करून त्यांनी केलेली असामान्य ज्ञानसाधना बाबासाहेबांना प्रज्ञासूर्य बनवते असे प्रतिपादन आ. महाले यांनी केले. भारताबाहेरच्या जपानमधील या ज्ञानकेंद्रातील बाबासाहेबांच्या या स्मृतीस्थळास भेट देऊन आपण एक अविस्मरणीय अनुभव घेतल्याचे त्या म्हणाल्या. जगाला शांततेचा संदेश देणार्या तथागत गौतम बुद्धाचा वारसा भारतासाखाच जपणार्या जपानमधील लोकांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी असलेली आस्था पाहून आपण भारावल्याचे मत आ. श्वेताताई महाले यांनी या भेटीत व्यक्त केले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button