
खुरमपूर तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम नित्कृष्ठ, लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप
MH 28 News Live, लोणार : तालुक्यातील खुरमपूर येथील तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम हे अत्यंत नित्कृष्ठ दर्जाचे झालेले असून शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याने, या गंभीर बाबीला दोषी असणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी खुरमपूर येथील संतोष गोविंद चव्हाण यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. याबद्दलचे निवेदन त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला सादर केले.
सदर रस्त्यासाठी कोणत्याही प्रकारचे खडीकरण व मुरूमाचे काम करण्यात आलेले नाही, सदर सिमेंट रस्त्यासाठी वापरण्यात आलेली रेती ही स्थानिकच्या नदीपात्रातील मातीमिक्स नित्कृष्ठ रेती आहे. या रस्त्यासाठी लेव्हलींग करण्यात आलेली नाही, दबई केली नाही, रस्त्याला व्यवस्थित पाणी मारलेले नाही. अंदाजपत्रकानुसार कोणत्याही प्रकारचे काम झालेले नाही. परिणामी हा रस्ता जास्तकाळ टिकू शकत नाही. सिमेंट रस्ता हा तीन इंच जाडीचाच करण्यात आलेला आहे, याबाबत संबंधीत ठेकेदार वा अधिकाऱ्यांना विचारणा केली त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देऊन हेतुपुरस्सर दिशाभूल केली असे आरोप निवेदनातून करण्यात आले आहेत.
तरी आपण या बाबत गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत तात्काळ सखोल चौकशी करुन संबंधीत ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी व त्यांचे बिल अदा करण्यात येऊ नये ही नम्र विनंती. अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग बुलढाणा, कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालय बुलढाणा, उपविभागीय अधिकारी बांधकाम विभाग मेहकर, गटविकास अधिकारी पंचायत समिती लोणार यांच्यासहसंबंधित विभागात देण्यात आल्या आहे.