
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंकुशराव पाटील यांची मराठा महासंघाच्या विभाग उपाध्यक्षपदी नियुक्ती
MH 28 News Live, चिखली : सुमारे ४० वर्षांपासून सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले व अनेक समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंकुशराव पाटील यांची मराठा महासंघाच्या अमरावती विभाग उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दि. २८ मे रोजी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायक पवार यांनी एका पत्रकाद्वारे अंकुशराव पाटील यांची या पदावर नियुक्ती केली.
कृषी पदवीधर असलेले अंकुशराव पाटील यांचा शेती आणि शेतकरी हा जिव्हाळ्याचा विषय आहे. ग्रामीण भागातील अनेक विकास कामांमध्ये त्यांनी आजवर सक्रिय सहभाग घेतला आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर अंकुशराव पाटील यांनी वेळोवेळी ठोस भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या विविध आंदोलन आणि अभियानांमध्ये सदैव अग्रेसर असणारे अंकुशराव पाटील हे मराठा समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी देखील सदैव प्रयत्नशील राहिले आहेत. अमरावती विभागातील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील मराठा समाजामध्ये पाटील यांचा सर्वदूर व्यापक संपर्क देखील आहे. या सर्व बाबींचा विचार करून मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायक पवार यांनी अंकुशराव पाटील यांची संघटनेच्या अमरावती विभाग उपाध्यक्ष पदावर नियुक्ती केली.
आ. श्वेताताई महाले यांचे वडील असलेले अंकुशराव पाटील यांचे विविध सामाजिक संस्था आणि संघटनांशी निकटचे संबंध आहेत. मराठा महासंघाच्या अमरावती विभागीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मराठा समाजात सर्व स्तरातून आनंद व्यक्त होत आहे. आ. श्वेताताई महाले यांच्या निवासस्थानी आज मराठा महासंघातर्फे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायकराव पवार, कोषाध्यक्ष प्रमोद जाधव, विभागीय अध्यक्ष अनुजाताई सावळे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष संजय शिनगारे, सरचिटणीस गजानन माने, बुलढाणा शहराध्यक्ष सचिन परांडे, किशोर गरड, शैलेश सोले, रवी शिंदे आदींनी अंकुशराव पाटील यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मेरा बु ।।, अंत्री खेडेकर, सावरगाव डुकरे आदी गावांमधून तसेच चिखली शहरातून आलेले मराठा महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button