
दीड महिन्यात दुसरा खून; नशेत युवकाने केला चाकू हल्ला; मित्रासह दोन जखमी, एक ठार, बुलढाण्यात वाढती गुन्हेगारी नागरिकांसाठी धोक्याची घंटा
MH 28 News Live / बुलढाणा : शहरातील वाढत्या गुन्हेगारीला पुन्हा एकदा चाकू हल्ल्याने उघड केले आहे. बसस्टँड मागील जांभरून रोडवरील नाईटी चौक परिसरात रविवारी (दि. २१ सप्टेंबर) रात्री दहा वाजताच्या सुमारास झालेल्या धक्कादायक घटनेत २७ वर्षीय शुभम रमेश राऊत याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला.

प्राथमिक माहितीनुसार, आरोपी ऋषी जवरे हा नशेत त्या ठिकाणी आला होता. त्याचे कुणाशी तरी वाद झालेले असताना परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून शुभम पुढे सरसावला. मात्र भान हरपलेल्या ऋषीने थेट शुभमच्या छातीवर चाकू हल्ला केला. प्रतिकार करताना शुभमचा मित्र बॉबी हा जखमी झाला असून आरोपीलाही धुमश्चक्रीत चाकू लागल्याचे समजते.

गंभीर जखमी शुभमला तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात मोठी गर्दी उसळली होती. मृताच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडत पोलिसांकडे आरोपीविरोधात कडक कारवाईची मागणी केली.
गेल्या महिन्यात (१ ऑगस्ट) चिखली रोडवरील सनी जाधवच्या खुनानंतर अवघ्या दीड महिन्यात शहरात घडलेली ही दुसरी हत्या आहे. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे बुलढाण्याचे सुसंस्कृत शहर गुन्हेगारीच्या विळख्यात तर जात नाही ना? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.



