♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

खामगांवात जादा दराने सोयाबीन बियाणे विक्री; कारवाई होणार काय ?

MH 28 News Live, खामगाव : खरीप हंगामाची लगबग सुरू झाली असून, बियाणे विक्री सुरू झाली. मात्र शेतकऱ्यांची लूट करण्याचे प्रकार होत आहेत. जिल्ह्यात खामगावमध्ये सोयाबीन बॅग जादा दराने विक्रीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कृषी विभाग काय कारवाई करतो याकडे लक्ष लागले आहे.

हंगाम सुरू झाल्यानंतर बियाणे विक्री सुरू झाली. पण विक्रेते किमतीपेक्षा अधिक दराने विकत आहेत. बाजारपेठेत ठरावीक किमतीपेक्षा अतिरिक्त किमतीची आकारणी करून शेतकऱ्याची फसवणूक होत आहे. खामगाव येथील एका कृषी केंद्रात जास्त भाव आकारत सोयाबीन विकत आहे. या बाबत शेतकऱ्याने तक्रार केल्यानंतर तपासणी करण्यात आली.

खामगाव शहरातील सरकी लाइन भागातील या कृषी केंद्रातून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचा प्रकार बुधवारी (ता. ३१) उजेडात आला होता. बियाण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रतिबॅग ३६०० रुपयांऐवजी ४२०० रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला. प्रति बॅग ६०० रुपये अतिरिक्त आकारले होते. दोन बॅग सोयाबीनसाठी १२०० रुपये जादा घेतले होते.

या प्रकारामुळे संतप्त शेतकऱ्यांनी संबंधित कृषी केंद्रावर धडक दिली. संतप्त शेतकऱ्यांच्या भावना पाहता कृषी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पिंटू लोखडकार (रा. नागापूर) यांच्या तक्रारीची चौकशी करण्यात आली. तथ्य आढळून आल्याने संबंधित कृषी केंद्र आणि गोदामातील बियाणांच्या साठ्याची मोजणी पथकाने केली.

परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे कृषी केंद्राचा परवाना निलंबित करण्याची शिफारस करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या बाबत गुरुवारी (ता. एक) बुलडाणा येथे सुनावणी ठेवण्यात आली होती.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129