
बुलडाण्यात NIA ची छापेमारी. दुसऱ्याचे व्हॉट्स ॲप उघडून दहशतवाद्यांना पुरवत होता माहिती
MH 28 News Live, बुलडाणा : हल्ल्याचा कट रचल्या प्रकरणी चौकशीसाठी एनआयएने (राष्ट्रीय तपास संस्था) बुलडाणा तालुक्यात छापेमारी केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रायपूर येथे तीन दिवसांपूर्वी “एनआयए’ने एका संशयित व्यक्तीची चौकशी केली. वरिष्ठ अधिकारिक सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
उच्चस्तरीय सूत्रांच्या माहितीनुसार, २३ मार्चला एनआयएचे एक पथक बुलडाण्यात आले होते. हे पथक बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथे संशयिताच्या चौकशीसाठी गेले होते. एनआयएच्या कारवाईसंदर्भात गोपनीयता पाळण्यात येत होती. विशेष म्हणजे जिल्हा पोलीस दलातील मोजक्या अधिकाऱ्यांना या कारवाईसंदर्भात माहिती होती.
रायपूर येथील एका व्यक्तीच्या नावावरील मोबाइल क्रमांकावरून व्हॉटस् ॲप चॅट करण्यात आले होते. त्या चॅटमधून देशातील महत्त्वाची माहिती पाकिस्तानातील दहशतवाद्यांना पुरवल्याचा एनआयएला संशय आहे. दरम्यान, संबंधित व्यक्तीच्या मोबाइलवर ओटीपी पाठवून तो त्याला विचारून त्याच्या नावाचे व्हॉटस् ॲप अकाऊंट उघडले आणि त्याचा वापर दुसऱ्याच कुणीतरी दहशतवाद्यांना माहिती पुरवण्यासाठी केल्याचा संशय एनआयएला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.