
डेंग्यूग्रस्त भानखेडमध्ये आणखी एक बळी ; विवाहितेचा मृत्यू; प्रशासन कधी जागे होणार ?
MH 28 News Live, चिखली : तालुक्यातील भानखेड या गावी डेंग्यू तापाने थैमान घातले असून गेल्या काही दिवसांमध्ये येथे डेंगू तापाचा मोठा फैलाव झाला आहे, त्यामुळे दोन बालके या साथीच्या आजारात दगावली असून आज एका गर्भवती विवाहितेचा देखील मृत्यू झाल्यामुळे या प्रकारातील भीषणता अधिक वाढली आहे. हे सर्व होत असताना प्रशासन कधी जागे होणार ? आणि गावकऱ्यांना या आजारापासून कधी मुक्तता मिळणार ? असा प्रश्न भानखेडवासी करत आहेत.
चिखली शहराला लागूनच असलेल्या भानखेड येथे गेल्या तीन आठवड्यापासून डेंग्यू सदृश्य तापाची लागण लहान मुले तसेच वयस्कर व्यक्तींना झाली आहे. हा आकडा ५० पर्यंत गेला; त्यातील काही रुग्ण बरे झाले अद्यापही २५ रुग्ण वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत. यापैकी काही रुग्ण चिखलीमध्ये, काही बुलढाण्यात तर काही छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात आहेत. यापैकी दोन मुले दगावली असून आज एका विवाहीतेचा मृत्यु झाल्यामुळे गावातील वातावरण चिंताजनक बनल्याचे वृत्त MH 28 News Live ने आज दुपारी प्रसिद्ध केले होते. दरम्यान आरोग्य विभागाने गावामध्ये तपासणी औषधोपचार व खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतने स्वच्छता मोहीम हाती घेतल्याचेही माहिती आहे. परंतु, रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात असल्यामुळे या उपाययोजना अद्याप प्रभावी ठरल्या नाहीत. कांचन सुनील तारू या २३ वर्षीय विवाहितेचा देखील आज सकाळी मृत्यू झाला. विशेष म्हणजे मयत विवाहिता कांचन तारू ह्या गर्भवती होत्या आणि तशा अवस्थेमध्येच त्यांना तापाची लागण झाल्यामुळे या विवाहितेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. एकूणच भानखेड गावामध्ये या प्रकारामुळे दहशत पसरली असून प्रशासनाने आरोग्य विभागाला युद्ध पातळीवर कामाला लावावे आणि गावाला या साथीच्या आजारापासून लवकरात लवकर सोडवावे अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.