
डेंग्यूच्या तापाचा राजकारणावर सुद्धा प्रभाव; काँग्रेस, मनसेने केली तातडीच्या उपाययोजनांची मागणी तर आ. श्वेताताई महाले यांनी उचलली तातडीची पावले
MH 28 News Live, चिखली : तालुक्यातील भानखेड या गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू तापाच्या साथीने थैमान घातले आहे. या तापाच्या साथीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे दोन मुले व एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने गावामध्ये नीतीचे वातावरण पसरले आहे. या संदर्भात प्रसार माध्यमांनी बातम्या प्रकाशित केल्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये देखील याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही डेंगू तापाची साथ आटोक्यात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आरोग्य विभागाकडे केली असून आ. श्वेताताई महाले यांनी देखील प्रशासनाला त्वरित हालचाली करण्याचे निर्देश देऊन भानखेड येथे विविध उपायोजना राबवण्यासंदर्भात जातीने लक्ष घातले आहे.
तीन आठवड्यापासून भानखेड गावामध्ये डेंग्यू तापाची साथ थैमान घालत आहे. या आजारामुळे गावातील दोन बालके यापूर्वी दगावली असून काल एका गर्भवती विवाहितेचा देखील मृत्यू झाला. या तीन घटनांमुळे गावातील वातावरण चिंताजनक बनले आहे. भानखेड शिवाय सवना येथे सुद्धा डेंग्यू तापाचा प्रसार झाला असून एका बालकाला उपचारासाठी चिखली येथे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. MH 28 News Live सह अन्य प्रसार माध्यमांनी भानखेड येथील वृत्त प्रकाशित केल्यानंतर तालुक्यातील राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधींनी देखील या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली. काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष समाधान सुपेकर यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देऊन वानखेडे येथे त्वरित डेंगूचा ज्वर नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे; याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश परिहार यांनी देखील अशाच आशयाची मागणी आरोग्य विभागाकडे केली आहे. आ. श्वेताताई महाले यांनी जागरूक लोकप्रतिनिधीची आपली भूमिका बजावत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने भानखेड येथे पाठवून डेंग्यू ताप नियंत्रणात आणण्याबाबत ताबडतोब उपाययोजना करण्याचे व गावामध्ये स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश दिले आहेत.