
खामगाव – जालना रेल्वे मार्गाला ५० टक्के राज्य हिस्सा देण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळात त्वरित मंजूर करा – आ. श्वेताताई महाले यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केंद्राकडून डीपीआर येताच राज्य शासन आपला हिस्सा देणार; मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन खा. जाधव यांच्यासह रायमुलकर फुंडकर व गायकवाड या तिघा आमदारांचीही निवेदन देताना उपस्थिती
MH 28 News Live, चिखली : बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा असलेल्या खामगाव – जालना रेल्वेमार्गाचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी आ. श्वेताताई महाले सातत्याने प्रयत्न करत आहेत. याच आठवड्यात नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री व रेल्वे राज्य मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून निवेदन सादर केले आहे. विशेष म्हणजे श्वेताताईच्या पुढाकारातून निवेदन देते प्रसंगी खा. प्रतापराव जाधव तसेच आ. डॉ. संजय रायमुलकर, आ. आकाश फुंडकर व आ. संजय गायकवाड हे तिघे देखील उपस्थित होते.
सुमारे ११० वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या खामगाव – जालना रेल्वेमार्गाचा मुद्दा अनेक वर्षापासून जिल्ह्यामध्ये महत्त्वाचा विषय म्हणून गाजत आहे. हा प्रलंबित मार्ग त्वरित सुरू व्हावा यासाठी रेल्वे लोकआंदोलन समिती १८ वर्षापासून प्रयत्न संघर्ष करत आहे. श्वेताताई महाले यादेखील आमदार होण्याच्या आधीपासून या रेल्वे मार्गासाठी वेगवेगळ्या माध्यमातून शासनाकडे मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे औचित्य साधून आ. श्वेताताई महाले यांनी दि. ८ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना याबद्दलचे निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये खामगाव – जालना रेल्वेमार्गाला ५० टक्के भागीदारी देण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्वरित मंजूर करावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
राज्य शासनाने ५० टक्के हिस्सा त्वरित द्यावा – आ. श्वेताताई महाले
खामगाव – जालना रेल्वे मार्गाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये भारत सरकारच्या पुंजी निवेश कार्यक्रमांतर्गत मान्यता दिल्याने सदर मार्गाचे सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आलेले आहे. याबाबत वाणिज्यिक सर्वेक्षणही झालेले आहे. खामगाव जालना या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने आपला हिस्सा भरावा यासाठी या संदर्भात महाराष्ट्र विधासभेच्या सभागृहात दि. ४ मार्च २०२० रोजी तारांकित प्रश्न क्र १७०९ विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून खामगाव – जालना रेल्वेमार्गाच्या विषयाला पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या सभागृहात वाचा फोडली होती . याशिवाय मार्च 2023 च्या अर्थ संकल्पात या रस्त्याचा समावेश करण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली असता त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन खामगांव – जालना रेल्वे मार्गाला राज्याच्या अर्थसंकल्पात समाविष्ट करून बुलडाणा जिल्ह्याला प्रथमच आपल्यामुळे न्याय मिळाला आहे. महाराष्ट्र राज्याच्या सन २०२३ च्या अर्थसंकल्पात तेव्हा अर्थ खाते सांभाळणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी खामगांव – जालना रेल्वेमार्गासाठी महाराष्ट्र राज्याचा हिस्सा भरण्यास सहमती दर्शवलेली आहे.
विदर्भ मराठवाड्याची भाग्यरेषा ठरणाऱ्या आणि या दोन्ही मागास प्रदेशाला जोडणाऱ्या या खामगांव जालना रेल्वे मार्ग तातडीने सुरू करणे गरजेचे आहे. या रेल्वेमार्गासाठी राज्याने आपला हिस्सा भरावयाचा आहे. दि. २८ जुलै २०२३ च्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत जालना ते जळगाव या ब्रॉडगेज मार्गासाठी ३५५२ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. खामगांव – जालना रेल्वेमार्गाच्या मान्यतेची अर्थ संकल्पात घोषणा होऊनही यासाठी अद्याप तरतूद केली नसल्याने खामगांव – जालना रेल्वे मार्गासाठी राज्याने आपला हिस्सा भरावा यासाठी याविषयीचा प्रस्ताव मंत्री मंडळाच्या बैठकीत घेऊन हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर सुरु व्हावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशित करण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
डी पी आर आल्यानंतर लगेच निधी मंजूर करणार – मुख्यमंत्री शिंदे
खामगाव – जालना रेल्वेमार्गाच्या संबंधित असलेला डीपीआर केंद्र शासनाकडून अद्याप राज्य सरकारकडे प्राप्त झाला नाही. हा डीपीआर आल्यानंतर किती नेमकी किती रक्कम राज्य सरकारने आपला ५० टक्के हिस्सा म्हणून मंजूर करायची आहे ते निश्चित होईल व त्यानंतर लगेच महाराष्ट्र शासन आपला राज्य हिस्सा देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करून त्याबाबतचे पत्र केंद्र शासनाकडे पाठवेल असे ठोस आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ. मदार श्वेता ताई महाले यांच्या निवेदनासंदर्भात दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देताना आमदार श्वेता ताई महाले यांच्यासोबत भाजप – शिवसेना महायुतीचे खा. प्रतापराव जाधव, मेहकरचे आ. डॉ. संजय रायमुलकर, खामगावचे आ. आकाश फुंडकर व बुलढाण्याचे आ. संजय गायकवाड हे देखील उपस्थित होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button