
शिपाई भरतीत बनावट गुणपत्रिका सादर करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल; त्यापैकी एक बुलढाणा जिल्ह्यातला
MH 28 News Live / मुंबई : उच्च न्यायालयाच्या शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत बनावट शैक्षणिक कागदपत्रे सादर करून फसवणूक करणाऱ्या पाच उमेदवारांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना उच्च न्यायालयाच्या अपिलीय शाखेच्या भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेवरच प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे.
या प्रकरणात वाशिमच्या अविनाश सुधाकर पाचपिले, बुलढाण्याच्या अजय भाऊदेव गायकी, कोल्हापूरच्या ऋषिकेश सुरेश केदारे, छत्रपती संभाजीनगरच्या मंगेश सुभाष राणे आणि यवतमाळच्या विक्रम परांजपे या पाच उमेदवारांचा समावेश आहे. सहाय्यक व्यवस्थापक गणेश लालजी जावरे यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी फसवणूक आणि बनावट दस्तऐवज सादर केल्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
२१ मार्च २०२३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने शिपाई पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. किमान शैक्षणिक पात्रता सातवी उत्तीर्ण अशी असून, २४ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान अर्ज मागवण्यात आले होते. अर्जदारांची निवड स्क्रीनिंग टेस्ट, शारीरिक चाचणी आणि मुलाखतीद्वारे करण्यात आली होती.
एकूण १२८ उमेदवारांची अंतिम निवड झाली होती. परंतु नियुक्तीपूर्वी जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांमार्फत गोपनीय पडताळणी केली जात होती. यामध्ये शैक्षणिक कागदपत्रे तपासणीदरम्यान पाच उमेदवारांच्या गुणपत्रिकांबाबत शंका निर्माण झाली. त्यामुळे संबंधित शाळांकडे या कागदपत्रांची खातरजमा मागवण्यात आली.
तपासाअंती संबंधित शाळांनी हे प्रमाणपत्रे खोटे असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पाचही उमेदवारांनी बनावट गुणपत्रिका सादर करून नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. या गंभीर प्रकारामुळे न्यायालयाच्या भरती प्रक्रियेत प्रामाणिकतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी आता गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. लवकरच संबंधित उमेदवारांची चौकशी करून जबाब नोंदवले जाणार आहेत.