
रणरागिनींनी दारूबंदीसाठी पुकारला एल्गार… वडाळी येथील महिला व ग्रामस्थांची सिंदखेडराजा पोलीस ठाण्यावर धडक… ग्रामपंचायतने ठराव करूनही अवैध दारू विक्री सुरूच
MH 28 News Live / सिंदखेडराजा : तालुक्यामधील वडाळी या गावात ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव मंजूर केल्यानंतरही येथे अवैध दारू विक्री सर्रास सुरू आहे. दारू विक्रेत्यांना सांगून देखील दारू विक्रेते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. ते गावामध्ये गुंडगिरी करतात व आमचे कोणी काहीच वाकड करू शकत नाही, असे सांगतात. कारण आम्ही पोलिसांना हप्ते देतो, त्यामुळे आम्ही कोणालाच घाबरत नाही असे म्हणून अवैध दारू विक्री करत आहेत. या सततच्या त्रासाला कंटाळून वडाळी येथील रणरागिनींनी ग्रामस्थांनी समावेत सिनखेडराजा पोलीस ठाण्यावर धडक देत दारूबंदीसाठी एल्गार पुकारला.
गावामध्ये पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. आजूबाजूच्या गावातील मद्यपी दारू पिण्यासाठी गावात येतात व दारू पिल्यानंतर भांडणे जातिवाचक शिवीगाळ करतात. याचा वाईट परिणाम शाळकरी मुलांवर होत आहे. गावातील अल्पवयीन मुले सुद्धा नशेच्याअधीन गेले आहेत. गावातील जातीय सलोखा बिघडला असून गावातील अवैध दारू बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव सुद्धा पारित केला आहे. तरी देखील दारू विक्री बंद झालेली नाही.
उपोषणाचा दिला इशारा
पोलीस प्रशासनाकडे याबाबत तक्रारी दिल्यानंतर देखील पोलीस विभगाकडून दुर्लक्ष केले जात आहे. वडाळी येथील अवैध दारुविक्री तात्काल बंद करावी; अशी मागणी घेऊन संतप्त महिलांनी आज सिंदखेडराजा पोलीस ठाण्यावर धडक दिली आहे. गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ठाणेदार ब्रह्मानंद शेळके यांना निवेदन देण्यात आले. यानंतर देखील दारू विक्री बंद झाली नाही; तर उपोषणाचा इशारा महिलांनी दिला आहे.



