
खामगावात अल्पवयीन मुलीला मध्यरात्रीच पळवले.
MH 28 News Live, खामगांव : १६ वर्षीय मुलीला गावातीलच तरुणाने फूस लावून पळवून नेल्याची घटना खामगाव तालुक्यातील लासुरा जहाँगीर येथे २६ मार्चला मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास घडली. मुलीच्या आईने खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात काल, २७ मार्चला धाव घेऊन तरुणाविरुद्ध तक्रार दिली आहे.
अविनाश रुस्तम अवचार (२१, रा. लासूरा जहाँगीर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. तक्रारदार महिला विधवा असून, तिला ३ मुली व १ मुलगा आहे. नंबर दोनच्या १६ वर्षीय मुलीसोबत गावातील अविनाश जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता व बोलत होता. मुलीच्या आईने अनेकदा त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्यात काहीही फरक पडला नाही.
२६ मार्चच्या मध्यरात्रीनंतर एकला मुलीच्या आईला जाग आली, तेव्हा मुलगी दिसली नाही. तिचा गावात शोध घेऊनही ती मिळून आली नाही. अविनाशच्या घरी जाऊन पाहिले असता तोही घरी नव्हता. तो कुठे गेला हे त्याच्या घरच्यांना माहीत नसल्याचे ते सांगत होते. अविनाशच्या जवळच्या मित्रांना सुद्धा तो कुठे गेला हे माहीत नव्हते. अविनाशने एका मित्राला पैसे मागितल्याचे त्याच्या मित्राने सांगितले. त्यामुळे अविनाशनेच मुलीला फूस लावून पळवून नेल्याचे मुलीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी अविनाशविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.



