
“झिंगाट नवरदेवांचे ‘तलवारी’ थिरकवणं पडलं महागात ! आता कोर्टाची वरात सुरू… खामगाव तालुक्यातील प्रकार
MH 28 News Live : खामगाव तालुक्यात चिंचपूर गावात दोन नवरदेवांनी लग्नाच्या वरातीला असा काही ‘फुल ऑन झिंगाट’ टच दिला की थेट पोलिसांच्या ‘नजरे’त सापडले ! राहुल राजू रोडे आणि संकेत राजेंद्र इंगळे या दोघांनी हातात तलवार, चेहऱ्यावर हसू आणि पायात ताल घेऊन थिरकताना जो जलवा केला, तो थेट सोशल मीडियावर झळकला… आणि मग काय, पोलिसांचीही नजर तिथं स्थिरावली.
गावात दोन वेगवेगळ्या लग्नात ‘झिंग झिंग झिंगाट’ गाण्यावर तलवार घेऊन थिरकणारे हे नवरदेव कायद्याच्या रेषा पार करतात, हे त्यांना कुठे ठाऊहोतं तं? धमाकेदार नाचगाणी, ढोल-ताशांचा गजर, आणि जल्लोषात बुडालेली वरात – सगळं सुरळीत सुरू होतं, पण तलवार नाच बघून पोलिसांनी त्यांच्या आनंदावर ‘ब्रेक’ लावला.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या थिरकत्या क्षणांमुळे हिवरखेड पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता लग्नाची वरात झाली संपन्न, पण कोर्टाची वरात मात्र थोडी ‘गंभीर’ ठरणार! लग्नात थिरकणं चालतं पण हातात तलवार असेल, तर पोलिसही नाचायला लावतात बरं!