
सुनगाव ग्रामपंचायतीचे नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष; नाल्यांचे पाणी घरात घुसले
MH 28 News Live / जळगाव जामोद अमोल भगत) : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असूनही सुनगाव ग्रामपंचायतीकडून गावातील स्वच्छतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र वॉर्ड क्रमांक १ मध्ये दिसून येत आहे. गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ साचलेले पाणी, सांडपाण्याची निकृष्ट व्यवस्था, व पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाले नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
ग्रामपंचायतीने अनेक ठिकाणी रस्ते खोदून तसेचच सोडले आहेत. पंधरा ते वीस दिवस उलटून गेले तरी रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले असून, नाले तुडुंब भरलेले आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरण्याबरोबरच नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
अवकाळी पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. अनेक घरांमध्ये नाल्यांचे पाणी घुसल्याचे प्रकार घडले आहेत. स्थानिक नागरिक संजय निमकर्डे यांनी वारंवार सरपंच व ग्रामसेवकांना याबाबत सांगूनही त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, गावात सफाई कामगार नीट काम करत नाहीत तसेच कचरा गोळा करणारी गाडीही नियमितपणे येत नाही. या परिस्थितीकडे वॉर्ड क्रमांक १ चे सदस्य आणि संपूर्ण ग्रामपंचायतीने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून भविष्यात मोठा आजार किंवा समस्या उद्भवणार नाही.