
अजित पवारांच्या ताफ्यातील रुग्णवाहिकेला अपघात
MH 28 News Live / अकोला : अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील रुग्णवाहिकेचा आज अपघात झाला. ही घटना शिवणी विमानतळावरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येत असताना घडली.
अजित पवार सकाळी साडेनऊ वाजता अकोल्यात दाखल झाले. विमानतळावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांचा ताफा अकोला शहरात प्रवेश करत असताना, पाठीमागे असलेल्या रुग्णवाहिकेने थार गाडीला धडक दिली. यामुळे ताफ्यात थोडा गोंधळ निर्माण झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. थोडेफार वाहनांचे नुकसान झाले असले तरी ताफ्याचा पुढचा कार्यक्रम यथावकाश सुरू ठेवण्यात आला.
अजित पवार अकोला आणि वाशिम जिल्ह्याच्या आढावा बैठकीसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी अकोल्यात आले आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचे कडेकोट बंदोबस्त करण्यात आला असून, या अपघातामुळे क्षणिक खळबळ निर्माण झाली होती. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी त्वरेने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.