♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

जिल्ह्यात गूढ आजारांची साखळी ! आता मेहकर तालुक्यात ‘हाताला भेगा’ आजाराची दहशत

MH 28 News Live / मेहकर : गेल्या काही महिन्यांपासून बुलढाणा जिल्हा विविध गूढ आजारांनी ग्रासलेला दिसत आहे. आधी टक्कल पडणे, केस गळती, नखे गळणे या विचित्र लक्षणांनी जिल्हावासीय चिंतेत असतानाच आता मेहकर तालुक्यात नवीनच आजार समोर आला आहे – हाताला खोल भेगा पडण्याचा.

मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख या गावातील तब्बल वीस नागरिकांनी हातावर खोल भेगा पडण्याच्या तक्रारी केल्याने आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाली आहे. विशेष म्हणजे हे गाव केंद्रीय आरोग्य व आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मतदारसंघात येते, त्यामुळे अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घातले आहे.

या घटनांनंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून एक विशेष पथक गावात दाखल झाले. जिल्हा साथरोग व सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. बालाजी आद्रट, तसेच डॉ. माधुरी मिश्रा व आरोग्य सेवक-सेविकांच्या टीमने रुग्णांची तपासणी केली.

काय आहे हा आजार ?

तपासणीदरम्यान २० रुग्णांपैकी बहुतांश रुग्णांना ‘इसबगोल’ (एक्झेमा/पालमोप्लांटर केरटोडर्मा) हा त्वचारोग असल्याचे निष्पन्न झाले. हे रुग्ण गेल्या १ ते ५ वर्षांपासून या आजाराने त्रस्त असून, बुलढाणा आणि अकोला येथील डॉक्टरांकडून उपचार घेत आहेत.

डॉक्टर तांगडे यांच्या माहितीनुसार, हा आजार संसर्गजन्य नाही. तो पाण्यामुळे होत नाही. काही विशिष्ट प्रतिजिन (antigens) व हानिकारक रसायनांच्या संपर्कात आल्यास शरीराची स्वतःच्या पेशींवर प्रतिक्रिया (Autoimmune reaction) होते आणि त्यामुळे हा आजार होतो.

उपाय आणि मार्गदर्शन

आरोग्य विभागाने रुग्णांना योग्य उपचार, औषधे व घ्यावयाची काळजी यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन दिले आहे. स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे.

जिल्ह्यात एकामागून एक गूढ आजार समोर येत असल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, अद्यापही या सर्व घटनांचा वैज्ञानिक अहवाल लालफीतशाहीच्या जाळ्यात अडकलेला आहे. जनता मात्र यामुळे अधिकच भयभीत व संभ्रमित झाली आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129