♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

हिंदी सक्तीला मनसेचा कडाडून विरोध; चिखलीतील सर्व शाळांना पोहोचले राज ठाकरे यांचे पत्र

MH 28 News Live / चिखली : महाराष्ट्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांवर हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या प्रयत्नांवर मनसेने तीव्र आक्षेप घेतला असून, यासंदर्भात पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र चिखली तालुक्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पोहोचविण्यात आलं.

राज्य शासनाच्या शिक्षण धोरणात केलेल्या बदलानुसार मराठी, इंग्रजीसह हिंदी भाषा सक्तीची करण्याचा प्रस्ताव होता. सुरुवातीला शिक्षण विभागाकडून तीन भाषांचा अभ्यासक्रम लागू करण्यात आला, मात्र त्यात हिंदीची सक्ती करण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडाडून आक्षेप घेतला. जनतेत निर्माण झालेल्या नाराजीमुळे सरकारने नंतर आपली भूमिका मवाळ करत हिंदी सक्ती न करता इच्छेनुसार हा अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाईल, असे स्पष्टीकरण दिले.

तथापि, हिंदी ही संपूर्ण भारताची राष्ट्रभाषा नसून ती फक्त काही राज्यांमध्ये वापरली जाणारी भाषा आहे, याकडे मनसेने लक्ष वेधले. हिंदीची सक्ती केल्याने स्थानिक बोलीभाषांचा ऱ्हास होण्याची भीतीही यावेळी व्यक्त करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या आदेशानुसार २० जून रोजी मनसेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांच्या नेतृत्वाखाली चिखली तालुक्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना राज ठाकरे यांचे पत्र देण्यात आले. या पत्रामध्ये विद्यार्थ्यांवर हिंदी भाषेची सक्ती होऊ नये आणि शाळांनी अशा सरकारी धोरणांना पाठबळ देऊ नये, अशी स्पष्ट विनंती करण्यात आली आहे.

पत्रात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की, विद्यार्थ्यांवर हिंदी लादणे म्हणजे त्यांच्या मातृभाषेवर अन्याय करणे आहे. यामुळे मराठी भाषेचे नुकसान तर होईलच, परंतु विद्यार्थ्यांनाही चुकीच्या दबावात आणले जाईल. त्यामुळे सर्व शाळांनी यामध्ये जागरूक राहून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यासंदर्भात जिल्हा परिषदेसह अन्य शाळांचा पहिला दिवस २३ जून रोजी असल्याने, त्या दिवशी संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत मनसे पदाधिकाऱ्यांमार्फत राज ठाकरे यांचे पत्र पोहोचवले जाणार असल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी दिली.

या मोहिमेत जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांच्यासोबत उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, तालुकाध्यक्ष विनोद खरपास, मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कापसे, उपतालुकाध्यक्ष संदीप नरवाडे व विद्यार्थी सेनेचे उपतालुकाध्यक्ष अंकित इंगळे हे देखील उपस्थित होते.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129