
शिक्षण मंत्र्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांना जुंपले कामाला शाळेच्या पहिल्याच दिवशी घडला सिनगाव जहांगीर मध्ये प्रकार
MH 28 News Live / देऊळगाव राजा : विदर्भातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आज २३ जूनपासून सुरू होत असताना, देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहांगीर येथील प्राथमिक शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी या शाळेला भेट देणार असल्याने, त्यांच्या आगमनापूर्वी शिक्षकांनी शाळेतील लहानग्या विद्यार्थ्यांकडून शाळा झाडणे, परिसर स्वच्छ करणे, कचरा उचलणे अशी कामे करवून घेतली.
शासनाच्या ‘स्वच्छ शाळा, सुशिक्षित बालक’ या उद्दिष्टाच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून श्रम घेतल्याचा हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे. शिक्षणमंत्र्यांच्या स्वागताची तयारी करताना चिमुकल्यांनाच झाडू हाती देण्यात आले, ही दृश्ये स्थानिक नागरिकांनी पाहिल्यानंतर संताप व्यक्त केला.
दरम्यान, मंत्री दादा भुसे शाळेत दाखल झाल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी याची गंभीर दखल घेतली असून संबंधित जबाबदारांवर कारवाईचा इशारा दिला आहे. “विद्यार्थ्यांचे स्थान हे शिक्षणाच्या केंद्रस्थानी असावे, श्रमिकांच्या भूमिकेत नव्हे,” असे स्पष्ट करत शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शाळांमध्ये अशा प्रकारच्या अनैतिक वागणुकीस मुळापासून आळा घालण्याचे निर्देश दिले आहेत.