
चिखली शहरात लवकरच उभारला जाणार छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा; सध्याचा पूर्णाकृती पुतळा हलवण्याची कार्यवाई उद्यापासून होणार सुरू
MH 28 News Live / चिखली : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा चिखली शहरात लवकरच उभारला जाणार असून सध्या शहराच्या मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेवर हा नवीन पुतळा उभारला जाणार आहे. त्याकरिता सध्या असलेला पुतळा काढण्याच्या कार्यवाहीला बुधवार दि. २५ जून रोजी सुरुवात होत आहे. तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी, चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता तसेच शहरातील सर्व महत्त्वाचे राजकीय पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत या कार्यवाहीला उद्या सकाळी ११ वाजता प्रारंभ होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये १९८५ मध्ये शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा नगरपालिकेद्वारे स्थापन करण्यात आला होता. त्याच जागेवर महाराजांचा भव्य असा नवीन अश्वारूढ पुतळा स्थापन केला जात आहे. या संबंधातील सर्व प्रशासकीय मान्यता राज्य शासनाद्वारे देण्यात आल्या असून जिल्हास्तरीय पुतळा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी याबाबत नगरपालिकेला दि. ६ मे रोजी पाठवलेल्या पत्राद्वारे सूचित केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानंतर पुतळा हलवण्याच्या हालचाली पालिका प्रशासनाने सुरू केल्या असून सध्या असलेला पुतळा सुरक्षितपणे काढून पुतळ्याच्या खाली असलेल्या चौथऱ्याचे नव्याने बांधकाम केले जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना या जागेवर करण्यात येईल. त्या दृष्टीने बुधवारी सकाळी ११ वाजता पुतळा हलवण्याच्या कार्यवाहीला सुरुवात होत आहे. तहसीलदार संतोष काकडे, नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, पोलीस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता दीपक चिंचोले या शासकीय अधिकाऱ्यांसह शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ही कार्यवाही होणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.