
आ. मनोज कायंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अंचरवाडीत पार पडले मोफत आरोग्य तपासणी शिबिर; ६४२ रुग्णांनी घेतला लाभ
MH 28 News Live / अंचरवाडी : मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २३ जून रोजी अंचरवाडी येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. नेहमी गाजावाजा आणि औपचारिक कार्यक्रमांपेक्षा समाजोपयोगी उपक्रम हाच खरा सन्मान मानत या शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराच्या अध्यक्षस्थानी आमदारांचे बंधू सतीश कायंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सुभाष दराडे, गणेश परिहार, विलास गाडेकर, साहेबराव सरपंच आणि एकनाथ अर्जुन सुरडकर यांची उपस्थिती लाभली.
या आरोग्य शिबिरात विविध आजारांवर उपचारासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा दिली. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अतुल पवार, मेडिसिन तज्ज्ञ डॉ. सावळे, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. राऊत, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. बंगाळे, बालरोगतज्ज्ञ डॉ. आखाडे तसेच दंतरोग तज्ज्ञ डॉ. (सौ.) बंगाळे (महाडिक), डॉ. वायाळ व डॉ. जेऊघाले यांनी रुग्णांची तपासणी केली.
संतोष परिहार यांच्या वतीने रुग्णांना मोफत औषधे व गोळ्यांचे वितरण करण्यात आले. एकूण ६४२ रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सतीश कायंदे म्हणाले, “वाढदिवसाच्या निमित्ताने हार-तुरे, फटाके व जाहिरातबाजी करण्यापेक्षा गरजू रुग्णांची सेवा करून त्यांचे आशीर्वाद मिळवणे हेच खरे समाधान आहे.” दराडे सर यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल संतोष परिहार, आटोळे आणि असिफ शेख यांचे विशेष अभिनंदन केले. शिबिरास माजी जि.प. सदस्य भगवान मुंढे, खंडू मांटे, माजी पंचायत समिती सदस्य अरुण पवार, विष्णु पाटील घुबे, रुपेश रिंढे, यु.टी. परिहार, हनुमान मिसाळ, डॉ. जगताप, भिकन भुतेकर, श्याम राठोड, ज्ञानेश्वर चव्हाण, प्रकाश चव्हाण यांचाही उत्स्फूर्त सहभाग होता.
कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन परमेश्वर परिहार यांनी केले, तर आभार प्रदर्शन दत्ताभाऊ रुपसिंग परिहार यांनी केले. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा आदर्श समोर ठेवत विधायक कार्याचा खरा अर्थ जनतेसमोर आला.