
वाहन लिलावातून महसूलवाढ; जप्त १,२६६ वाहनांमधून ७५ लाखांचा महसूल; आणखी ४२ वाहनांचा लिलाव होण्याची शक्यता
MH 28 News Live / बुलढाणा : जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांद्वारे जप्त करण्यात आलेल्या तब्बल १,२६६ वाहनांचा यशस्वी लिलाव करण्यात आला असून, या लिलावातून सुमारे ७५ लाख रुपयांचा महसूल शासनाला मिळाला आहे. हे वाहन लिलाव जिल्हा प्रशासन आणि वाहतूक विभागाच्या समन्वयातून पार पडले.
वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करणारी, तसेच कर भरण्यात अपयशी ठरलेली ४२ वाहने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) मार्फत अलीकडेच जप्त करण्यात आली आहेत. ही वाहने देखील लिलावासाठी ठेवण्यात येणार असून, त्यातून देखील राज्य सरकारला मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त महसूल मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या लिलाव प्रक्रियेची जबाबदारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे (एसटी महामंडळ) सोपविण्यात आली असून, सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही वाहने लिलावात विक्रीस काढली जात आहेत. वाहने रस्त्यावर बेवारस स्थितीत राहिल्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर ताण येत होता, शिवाय रस्त्यावरील सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे अशा वाहनांची नोंद घेऊन त्यांना लिलावात विक्रीस काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.
जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग व आरटीओ कार्यालय यांनी एकत्रितपणे ही मोहीम राबवली असून, त्यामुळे वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आणि वेळेवर कर भरणे किती आवश्यक आहे, याची जाणीव देखील जनतेला होणार आहे. आगामी काळात अशा प्रकारच्या वाहनांवर अधिक कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत.