♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पंढरपूरच्या वारीत काळाने झडप घातली; कर्त्या पुरुषाच्या निधनाने कवठळ गाव शोकमग्न

MH 28 News Live / चिखली : तालुक्यातील कवठळ गावावर शोककळा पसरली आहे. आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेलेले कवठळ येथील ४२ वर्षीय रामदास पडघान यांचे अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ही काळजाला चिरून टाकणारी घटना ५ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही गावातील ४० ते ५० भाविकांची टोलकी पंढरपूरच्या वारीला निघाली होती. चंद्रभागेत पवित्र स्नान उरकून विठोबाच्या दर्शनाच्या वाटेवर रामदास पडघान हे काही वेळासाठी थांबले. रस्त्यावरील फळे घेऊन सर्वजण एकत्र बसले असताना, रामदास यांच्या छातीत अचानक वेदना उठल्या. सोबतच्या गावकऱ्यांनी धावतपळत त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, काळाने आपला घाला घातलाच. डॉक्टरांनी तपासणी करून रामदास पडघान यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि आकस्मिक मृत्यूची नोंद केली. रामदास पडघान यांचे पार्थिव घेवून पंढरपूरच्या वारीवर गेलेली मंडळी गावाकडे परतली तेव्हा कवठळ गावात शोककळा पसरली.

कर्त्या पुरुषाच्या अचानक जाण्याने त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी तसेच वृद्ध आई-वडील यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकाच क्षणात घरातलं आधारस्तंभ हरवल्याने गावकऱ्यांसह संपूर्ण कुटुंब हतबल झालं आहे. विठुरायाच्या नगरीतल्या वारीतच काळाने असा घाला घालावा, यावर गावकऱ्यांचा आजही विश्वास बसत नाही.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129